
देशातील विविध न्यायालयात अनेक वर्षं अनेक खटले प्रलंबित आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या वयापेक्षा जास्त काळ हे खटले प्रलंबित असल्याची वृत्तंही प्रसारित झाली होती. यातील एका खटल्याचा निकाल लागला आहे. 1951 सालातील हा खटला निकाली काढण्यात आला आहे. तब्बल 72 वर्षांपासून या खटल्यावर सुनावणी सुरू होती.
खटल्यावर कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी
बऱ्हामपूर बँक लिमिटेडच्या अवसायनाबाबत हा खटला होता. या खटल्यावर कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. हा खटला एवढा जुना आहे की, या न्यायालयाच्या विद्यमान मुख्य न्यायाधीशांचा जन्म खटला दाखल झाल्यानंतर साधारण एका दशकानंतर झालेला आहे. या खटल्याप्रमाणेच 1952 साली दाखल करण्यात आलेले आणखी 5 असेच जुने खटले आहेत. यातील दोन खटले हे दिवाणी असून ते पश्चिम बंगालच्या मालदा न्यायालयात प्रलंबित आहेत.
1951 साली कोर्टासमोर आला होता खटला
बऱ्हामपूर बँक लिमिटेडच्या अवसायनाचा खटला 1951 साली न्यायालयासमोर आला होता. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी कोलकाता उच्च न्यायालायने 19 नोव्हेंबर 1948 रोजी या बँकेला दिवाळखोर म्हणून जाहीर केले. तसेच या बँकेला बंद करण्याचा आदेश दिला. मात्र न्यायालयाच्या या आदेशाला आपले पैसे परत मिळावेत म्हणून अनेक ग्राहकांनी याचिकेमार्फत आव्हान दिल् होतं. या याचिकांच्या माध्यमातून 1 जानेवारी 1951रोजी पुन्हा हा खटला न्यायालयासमोर आला. त्यावेळी या खटल्याला 71/1951 हा क्रमांक देण्यात आला होता. तेव्हापासूनच या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात बँकेच्या अवसायनाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर दोन वेळा सुनावणी घेण्यात आली होती. मात्र, त्यावेळी या तारखांना कोणीही हजर राहिले नव्हते. मात्र आता हा खटला निकाली निघाला आहे.




























































