
नगर शहरासह जिह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोनपेक्षा (टू-प्लस) जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. शनिवारपर्यंत नगर शहरातील अशा 114 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. ‘टू-प्लस’चा आधार घेऊन शहरासह जिह्यातील गुन्हेगारांवर अशा कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मकरसंक्रांतीच्या दिवशी मंगलगेट परिसरातील जे.जे. गल्लीत दोन गटांमध्ये वाद होऊन दगडफेकीची घटना घडली. यानंतर एका महाविद्यालयात किरकोळ कारणातून दोन गट पुन्हा समोरासमोर आले. अशा एक ना अनेक छोटय़ा-मोठय़ा घटना शहरासह जिह्यात सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.
शहरातील तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. तीन सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली असून, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना जिह्यातून हद्दपार केले जाणार आहे. त्यांचा हद्दपारीचा प्रस्ताव पोलिसांकडून तयार केला जात आहे. तसेच कलम 109 नुसार दोन, तर कलम 110 नुसार 28 व्यक्तींकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या 81 व्यक्तींना कलम 149 नुसार नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्या हालचालींवर पोलिसांची नजर असणार आहे. दरम्यान, आतापर्यंत 114 गुन्हेगारांवर ही कारवाई केली असली, तरी यापुढेही अनेकांवर अशा कारवाई केल्या जाणार आहेत, असे अधीक्षक खैरे यांनी स्पष्ट केले आहे.



























































