रंगनाट्य – डावपेचांच्या मायाजालातले रहस्यरंजन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राज चिंचणकर

शह-काटशह, डावपेच, थरार, मायाजाल अशा बऱयाच गोष्टी एकत्रितपणे गुंफत रहस्यरंजन घडवणारे नाटक.

कुणी ‘त्या’ क्षेत्राला ‘बॉलीवूड’ म्हणतात, तर कुणी ‘हिंदी चित्रपटसृष्टी’ असे म्हणतात. संबोधन काही असू दे, पण त्या क्षेत्रात, किंबहुना त्या क्षेत्राच्या अंतरंगात काय काय चालते याचा थोडाफार अंदाज सर्वसामान्य रसिक जन लावत असतात. विविध प्रकारच्या ‘गॉसिप’चा उगम तिथे होत असतो. त्यामुळे बॉलीवूड ही नेहमीच आकर्षित करणारी बाब राहिली आहे. या बॉलीवूडचा आणि मराठी रंगभूमीचा तसा काही संबंध नाही; परंतु ‘काळी राणी’ या नाटकाच्या निमित्ताने मात्र असा संयोग जुळून आला आहे. बॉलीवूडच्या पार्श्वभूमीवरची एक गोष्ट या नाटय़ संहितेच्या माध्यमातून रंगमंचावर दृग्गोचर होत गेली आहे आणि त्याकरवी या नाटकाने बॉलीवूड जगताला स्पर्श केला आहे.

या नाटकाला बॉलीवूडची पार्श्वभूमी असल्याने त्याचे रंगमंचीय सादरीकरणही तशाच पद्धतीने करण्यात आले आहे. साहजिकच, या नाटकातल्या प्रत्येक पात्रावरही त्या क्षेत्राचा प्रकाशझोत पडत गेला आहे. 80च्या दशकातले बॉलीवूडचे संदर्भ या नाटय़ात मुरले असल्याने त्या काळात रमण्यासह या नाटय़ाची चवही तशीच बनली आहे. बॉलीवूडमधला एपंदर चमचमाट, यश, अपयश आणि यासोबतच यशप्राप्तीसाठी लागणाऱया मार्गावर चालताना अनाहूतपणे किंवा मुद्दाम घेतलेली वळणे, ‘गिव्ह अँड टेक’चा व्यवहार अशा सगळ्या गोष्टींचे रसायन या नाटय़ संहितेत नाटककार रत्नाकर मतकरी यांनी बेमालूम घडवून आणले आहे.

अशा प्रकारचे चटपटीत खाद्य हाती मिळाल्यावर कोणताही दिग्दर्शक त्याला ठसठशीत रुपेरी झालर देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. त्यानुसार या नाटकाचे दिग्दर्शक विजय पेंकरे यांनी बॉलीवूडच्या एपंदर थाटातच या संहितेचे सादरीकरण केले आहे. चित्रपटसृष्टीतल्या एखाद्या सेटवर फेरफटका मारल्याचा अनुभव या नाटकाच्या अंतरंगात विहार करताना येतो. मुखवटय़ांच्या आत दडलेले खरे चेहरे, एकमेकांमधले डावपेच, खऱयाखोटय़ाचे जग असे सर्वकाही त्यांनी संहितेनुरूप रंगमंचावर उभे केले आहे. नाटकात एकूण सहा पात्रे असली तरी त्यातल्या तीन प्रमुख पात्रांच्या खांद्यांवर भार ठेवून ही संहिता बोलत राहते आणि दिग्दर्शकाच्या कौशल्यदृष्टीने ती रंगमंचावर सादर होते. या नाटय़ात सूत्रधाराच्या माध्यमातून नाटकाचे प्रवेश एकमेकांत गुंफले गेले आहेत. नाटकाचा अंतिम चरण मात्र अगदी अचानकच समोर येऊन उभा ठाकतो आणि नाटक संपल्याचे कळून चुकते.

नीरा या तरुणीला बॉलीवूडमध्ये नाव कमवायचे आहे आणि असा ‘चान्स’ मिळावा म्हणून ‘ती’ या क्षेत्रातली प्रसिद्ध असामी असलेल्या लालजी नामक निर्मात्याच्या बंगल्यावर आली आहे. त्याचप्रमाणे जयराम हा एक होतकरू लेखकही या बंगल्यावर आलेला आहे. लालजींशी या दोघांची भेट होते आणि पहिल्याच भेटीत लालजी ‘बॉलीवूडची गरज म्हणून’ त्या दोघांचे नामकरण राणी व मोहित मैत्र असे करून मोकळे होतात. इथेच त्यांच्यातले इरादे बऱयापैकी स्पष्ट होत जातात. पदोपदी आकर्षणाचे जाळे विणणारी राणी तसेच मोहित व लालजींचे डावपेच यातून फुलणारी ही गोष्ट बॉलीवूडच्या अंतरंगाचे चित्र थोडय़ाफार फरकाने रंगमंचावर स्पष्ट करत जाते.

गेटअपच्या माध्यमातून प्रथमदर्शनीच आवश्यक तो माहौल निर्माण करण्याचे काम डॉ. गिरीश ओक यांनी या नाटकात ‘लालजी’ या पात्राद्वारे सूचकतेने केले आहे. बॉलीवूडचा निर्माता असल्याने या लालजींच्या तोंडी बऱयापैकी हिंदीमिश्रित मराठी भाषा आहे आणि तिचा लहेजा व्यवस्थित पकडत त्यांनी ‘लालजी’ हे पात्र उभे केले आहे. नीरा ऊर्फ राणीच्या भूमिकेला आवश्यक असणारे ग्लॅमर मनवा नाईक हिच्या ठायी आहेच. तिची अंगकाठी या पात्राशी पूर्णतः एकरूप होत नसली तरी अंगभूत गुणांची कास धरत मोठय़ा टेचात तिने ही राणी रंगवली आहे. शीर्षक भूमिकेचे वजन तिने यथोचित पेलले असल्याचे यातून स्पष्ट होत जाते. मोहितच्या भूमिकेत हरीश दुधाडे याला विविध विभ्रम दाखवण्याची संधी मिळाली असून त्याने त्यात परिपूर्ण रंग भरले आहेत. संपूर्ण नाटकावर त्याने त्याची पकड कायम ठेवली आहे. नंदनाच्या भूमिकेत चंद्रलेखा जोशी हिने दखल घेण्याजोगी कामगिरी केली असून तिच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली आहे. त्यांना मिळालेली आनंद पाटील व प्रदीप कदम या कलाकारांची साथही महत्त्वाची आहे.

आधीची नीरा आणि नंतरची राणी यांना मंगल पेंकरे यांनी दिलेली वेशभूषा उंची थाटातली आहे. मात्र, एका प्रवेशात तिला तुलनेने सामान्य वेशभूषा दिल्याने या पात्राचा स्तर किंचित ढळला आहे. कदाचित त्या प्रवेशासाठी लागणाऱया सुलभतेसाठी तसे केले गेले असावे, पण त्याच वेळी इतर प्रसंगांत मात्र त्यांनी या राणीसाठी काळ्या रंगाचा अधिकाधिक वापर करून निर्माण केलेली वेशभूषा नाटकाचा आशय गडद करत गेली आहे. गीतकार मंदार चोळकर लिखित व अजित परबच्या संगीत दिग्दर्शनाखाली संज्योती जगदाळेने गायलेले गाणे लक्षात राहणारे आहे. नाटकाचे एपंदर वेळोवेळी बदलणारे मूड लक्षात घेऊन शीतल तळपदे यांना प्रकाश योजनेसाठी यात बराच वाव मिळाला आहे आणि त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. बॉलीवूडच्या एखाद्या निर्मात्याचा बंगला जसा असू शकतो, त्याला तोडीस तोड असा बंगला नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी रंगमंचावर उभारला आहे. एकूणच शह-काटशह, डावपेच, थरार, मायाजाल अशा बऱयाच गोष्टी एकत्रितपणे गुंफत या नाटकाने रहस्यरंजन घडवून आणले आहे.

– [email protected]