
>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
आपल्या पारंपरिक साडय़ांपैकी एक म्हणजेच कांजीवरम. कांजीवरम साडय़ा दक्षिण राज्यातील कांचीपुरम शहरात बनविल्या जातात. हिंदू पुराणामध्ये कृष्णदेवराय राजाच्या वेळेपासून कांजीवरम साडय़ा त्यांच्या श्रेष्ठ कारागिरीसाठी ओळखल्या जाऊ लागल्या.
कांजीवरम साडी कितीही जुनी झाली तरी नवीन असल्यासारखीच दिसते. कांजीवरम साडीसाठी लागणारे रेशीम हे बंगलोरवरून, तर जरी सुरतवरून येते. तसेच पारंपरिक हातमागावर या साडय़ा विणल्या जातात. दररोज आठ तासांप्रमाणे साधारण आठ ते पंधरा दिवसांमध्ये या साडय़ा तयार होतात. मुघल पॅटर्न प्रेरित भरतकाम केलेली रचना किंवा मंदिराचे कोरीवकाम ही कांजीवरम साडय़ांची ओळख आहे. ही साडी हलकी असते. तिची आणखीन एक ओळख म्हणजे कांजीवरम साडीच्या भरतकामासाठी वापरलेले धागे तुमच्या साडीच्या पृष्ठभागाच्या
बॉर्डरशी जुळलेले पाहिजेत. टेम्पल बॉर्डर, चेक्स, पट्टे आणि बुट्टी, सूर्य, चंद्र, हंस, मोर, रथ अशा प्रकारच्या डिझाइन्स या साडीवर असतात. या साडीची बॉर्डर आणि पल्लू एकाच रंगाचा असतो. तिचे रंग डार्क, डोळे दीपतील असे असतात.
कांजीवरम साडीवरील मेकअप हा या साडीचा महत्त्वाचा भाग असतो. ही साडी जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी नेसणार असाल किंवा घरगुती फंक्शनसाठी नेसणार असाल, तर तेव्हा तुम्ही हलका मेकअप केला तर तो चांगला दिसतो. हलका बेस ठेवून साडीच्या रंगाप्रमाणे लिपस्टिक लावू शकता किंवा लाइट लिपस्टिकही तुमच्या ओठांवर छान दिसेल. तसेच या साडीवर तुम्ही डोळय़ांचा मेकअप मात्र हेवी केलेला छान दिसतो. या साडीवर हेवी काजळ तसेच लाइनरही थोडं डोळय़ांच्या बाहेर काढावे. विंग आयलायनर या साडीवर डोळय़ांचे तेज वाढवण्यास मदत करेल.
तुम्हाला जर इतर कुणाच्या लग्नात जाण्यासाठी ही साडी नेसायची असेल तर तुम्ही स्वतःसाठी मात्र एखादा लॉन्ग नेकलेस वापरा. नेकलेसला
मॅचिंग असे कानातले घाला. हलकासा मेकअप करा. तसेच साडीचा पल्लू तुम्ही हातावर सोडला तरीही तो तुम्हाला सुंदर दिसेल. तुमचे वय ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुमच्या हेअरस्टाइलची आणि त्याप्रमाणे कमी जास्त मेकअपची निवड कराल तर तुमच्या साडीचा लुक खरोखरच बदलून जाईल आणि तुम्हीही त्या पूर्ण लग्नामध्ये तुमचा वेगळेपणा सिद्ध करू शकाल.
कांजीवरम साडी जर तुम्ही खास लग्नासाठी नेसणार असाल नववधू म्हणून, तर मात्र या साडीचा पल्लू तुम्ही बांधलेला जास्त सुंदर दिसेल. कारण या साडीवर तुम्ही पल्लू बांधल्यानंतर कमरपट्टा लावू शकता. तसेच तुम्ही जी नववधूसाठीची ज्वेलरी असते ती घातल्यानंतर तुम्हाला एक हेवी लुक जर द्यायचा असेल तर तुम्ही लॉन्ग नेकलेस तसेच गळय़ाबरोबरचा नेकलेसही तुम्ही वापरू शकता. नववधूसाठी तुम्ही टेम्पल ज्वेलरी किंवा खास कुंदन ज्वेलरीचाही वापर या साडीवर करू शकता.
तुमचा टोन जर थोडा डार्क असेल तर तुम्ही ही साडी घेताना गोल्डन रंगाची किंवा लाइट बेच कलरची साडी घेतल्यास ती तुम्हाला जास्त उठून दिसू शकते. कारण या साडीचे रिफ्लेक्शन चेहऱयावर येत असल्यामुळे तुम्हाला एक छान टोन मिळू शकतो. तुमची हेअरस्टाइल करताना तुम्ही जर नववधू म्हणून हेअरस्टाइल करत असाल तर तुम्ही अंबाडा आणि त्यावर गजरा अशा प्रकारची हेअरस्टाइल करा किंवा तुम्ही लांब वेणीच्या प्रकारातील एखादी हेअरस्टाइल करू शकता. त्यावर गजरे सोडता येतील.

























































