
ओएलएक्सवर विकायला ठेवलेला मोबाईल खरेदी करण्याची तयारी दाखवायची आणि मोबाईल मालकाला मोबाईलसह एखाद्या हॉस्पिटलजवळ बोलवायचे. मोबाईल पत्नी अथवा नातेवाईकाला हवा असल्याचे सांगून त्यांना तो आधी दाखवावा लागेल अशी बतावणी करायची. त्यानंतर त्या बहाण्याने हॉस्पिटलात मोबाईलसह जाऊन पसार होणारा चोरटा आग्रीपाडा पोलिसांच्या हाती लागला आहे.
किरण (नाव बदलले) यांनी त्यांचा मोबाईल ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवला होता. राजकमल टांडीया (31) याने तो मोबाईल घेण्याची तयारी दाखवली. त्यानुसार टांडीयाने किरण यांना संदेश पाठवून तसे सांगितले. ओएलएक्स ऍपवर खरेदी-विक्रीबाबत बोलणे झाल्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी राजकमलने मोबाईल, त्याचा बॉक्स व बिल घेऊन किरणला मुंबई सेंट्रल येथील व्होकार्ड हॉस्पिटल येथे बोलावले. त्यानुसार किरण मोबाईल व बिल घेऊन तेथे गेले. हेअर नेट कॅप व मुखपट्टी लावलेल्या अवस्थेत राजकमल तेथे पोहचला. त्याने मोबाईल व बिलाची पाहणी केली. त्यानंतर सदर मोबाईल पत्नीसाठी घ्यायचा असून ती व्होकार्ड हॉस्पिटलात दाखल आहे. मोबाईल तिला दाखवतो मग पैसे देतो असे सांगून राजकमल मोबाईल घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला, पण तो परतलाच नाही आणि तेथून बेपत्ता झाला. बराचवेळ वाट पाहूनही राजकमल न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे किरण यांच्या लक्षात येताच त्यांनी आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक योगेंद्र पाचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद गायकवाड, सपोनि योगेश पाटील व पथकाने तपास सुरू केला. हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्यावर राजकमल हा नवी मुंबईतील तळवली कोळीवाडा येथे राहत असल्याचे निष्पन्न होताच त्याला तेथे जाऊन पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून अशाप्रकारे चोरी केलेले पाच मोबाईल, पाच सिम कार्ड, हेअर नेट कॅप, स्टेथसकोप, मुखपट्टी असा मुद्देमाल जप्त केल्याचे उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले.
मोबाईल चोरण्यासाठी अशी लढवायचा शक्कल
ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवलेला मोबाईल विकत घ्यायची तयारी दाखवून राजकमल संबंधित व्यक्तीला शहरातील कुठल्याही हॉस्पिटलजवळ बोलावतो. मग मोबाईल पत्नी अथवा नातेवाईकाला दाखवून आणतो अशी बतावणी करून चोरतो. अशाप्रकारे त्याने सेव्हन हिल्स, गोदरेज, जिनिव्हा आणि व्होकार्ड हॉस्पिटलजवळ बोलावून चौघांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे मोबाईल चोरून तो मग ओएलएक्सवर दुसऱयाला विकायचा.





























































