कोपरगावात ऊसतोडणी कामगारावर बिबटय़ाचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव तालुक्यातील वैजापूर सुराळा आणि कोपरगाव तळेगावमळे शिवाराच्या हद्दीतील सिकंदरभाई यांच्या शेतात ऊसतोडणी कामगार अशोक कारभारी दळवी यांच्यावर पहाटे बिबटय़ाने हल्ला केला. त्यात दळवी यांच्या डोळय़ास व डाव्या हाताच्या अंगठय़ास मोठी इजा झाली आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर ऊसतोडणीच्या कामासाठी मुकादम उत्तम पुंजाजी पगारे यांनी जळगाव जिह्यातील भायगाव येथील ऊसतोडणी कामगारांची टोळी आणली आहे. अशोक कारभारी दळवी हे बुधवारी पहाटे तळेगावमळे शिवारात ऊसतोडणी करत होते. यावेळी उसाच्या पाचटामध्ये दडून बसलेल्या बिबटय़ाने अशोक दळवी यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांच्या डाव्या डोळ्याच्या खाली इजा झाली. अशोक दळवी यांनी वेळीच स्वतःला सावरले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

वन विभागाने वेळीच उपाययोजना करावी
कोपरगाव तालुक्यात अनेक गावांत बिबटय़ांचा मोठय़ा प्रमाणात वावर सुरू आहे. वन विभागाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे; अन्यथा बिबटय़ामुळे शेतकरी शेतीकामासाठी धजावत नाही. बिबटय़ांची दहशत कमी करण्यासाठी वन विभागाने वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.