चिरा खाणीवरून केबलची चोरी, कळकी शिगवणवाडी येथील पाचवी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळकी शिगवणवाडी येथील एका जांभ्या चिऱ्याच्या खाणीवरून 450 मिटर लांबीची इलेक्ट्रीक केबल अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली आहे. दापोलीत जांभा चिऱ्याच्य़ा खाणीवरून केबल चोरून नेण्याची ही पाचवी घटना आहे. चिरा खाणीवरून केबल चोरीच्या वाढत चाललेल्या या घटनेने तालूक्यात एकच खळबळ उडाली असली तरीसुध्दा पोलिसांची झोप उडवणाऱ्या या घटनांचा अदयापही पोलिसांना चोरीचा छडा लावता आलेला नाही त्यामुळे चोरांचे चांगलेच फावले आहे.

दापोली तालूक्यात सध्या चि-याच्या खाणीवरून केबल चोरीला जाण्याच्या घटना घडण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. तालूक्यातील विनोद गोंधळेकर, सचिन डोंगरकर, पांडुरंग बांद्रे, नितिन जाधव तर कळकी शिगवणवाडी येथील अजित अनंत करबेले यांच्या चिरे खाणीवरून 450 मिटर लांबीची केबल चोरीला गेल्याची ही तालूक्यातील 25 दिवसातील पाचवी घटना घडली आहे. या चोरींच्या घटनांवरून दापोलीत एकच खळबळ उडाली आहे. दापोली तालूक्यात दोन पोलिस ठाणे आहेत एक दापोली पोलिस ठाणे तर दुसरे दाभोळ सागरी पोलिस ठाणे या दोन पैकी दापोली पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जांभा चिरे खाणीवरून केबल चोरीला जाण्याच्या 4 घटना घडलेल्या आहेत तर दाभोळ सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 1 घटना घडली आहे. त्यामुळे दापोली तालूक्यात 25 दिवसात एकुण 5 केबल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे केबल चोरीचे हे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा नियोजन सदस्य राहीलेल्या अनंत करबेले यांच्या मुलाच्या नावे परवाना असलेल्या कळकी शिगवणवाडी येथील जांभा चिरे खाणीवरून 450 मिटर लांबीची आणि 65 हजार रूपये किंमतीची तांब्याच्या धातुची वायर चोरीला गेल्याने याबाबतची अनंत सखाराम करबेले यांनी केबल चोरीची फिर्याद दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात दाखल केली असून या फिर्यादीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, नेहमीप्रमाणे चिरे उत्खननाचे काम आटोपून अनंत करबेले आणि त्यांचा मुलगा अजित करबेले हे पितापुत्र सायंकाळी 7 नंतर आपल्या गुडघे ब्राम्हणवाडी येथील राहत्या घरी वास्तव्यास गेले असता सायंकाळी सात ते सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञाताने 450 मिटर लांबीची आणि साधारपणे 65 हजार रूपये किंमतीची तांब्याच्या धातुची वायर ही चोरून नेल्याची घटना घडली. याबाबतचा दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात रितसर गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास हा सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पुजा हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र मोहीते यांनी तातडीने सुरू केला असला तरी दापोलीत केबल चोरीच्या वाढत्या घटना या पोलिसांच्या डोकी दुःखी ठरत असून पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. स्थानिकांसह काम करणा-यांना रोजगार मिळवून देणारा चिरे खाणीचा व्यवसाय अशा चोरींच्या घटनांमुळे धोक्यात आला असून केबल चोरी हा रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.केबल चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना आलेल्या अपयशामुळे चोरींच्या घटनेत वाढ झाली आहे त्यामुळे पोलिसांची जबाबदारी ही अधिक वाढली आहे.