
पारले-जी बिस्कीट पॅकेटच्या वजनात गडबड असल्याचा प्रकार नगर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. एका ग्राहकाने खरेदी केलेल्या बिस्कीटच्या पॅकेटचे वजन कमी असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी वैध मापनशास्त्र विभागाकडे तक्रार दिली होती. त्याची दखल घेत विभागाने वितरकाच्या गोदामावर छापा टाकला असता तेथे 50 बिस्किटांच्या पॅकेटपैकी पाच पॅकेटचे वजन कमी आढळून आले.
सतीश मेहत्रे यांनी एका दुकानातून पारले-जी बिस्कीटचे पॅकेट खरेदी केले होते. 100 ग्रॅम वजनाचे ते पॅकेट होते. मात्र, त्याचे मेहत्रे यांनी वजन केले असता ते वजनात कमी भरले. त्यामुळे त्यांनी वैध मापनशास्त्र विभागाकडे ऑनलाइन तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने या विभागाने मेहत्रे यांनी जेथून बिस्कीटचे पॅकेट खरेदी केले होते, त्याचे नाव व पत्ता मिळवला. त्यानंतर नगर जिह्याकरिता पारले-जी बिस्कीट कंपनीचे वितरक आहेत, त्यांच्या गोदामाची पथकाने तपासणी केली. त्या वेळी 100 ग्रॅम वजनाच्या बिस्किटांच्या पॅकेटचे वजन करण्यात आले. तेव्हा 50 पॅकेटपैकी पाच बिस्किटांची पॅकेट 95.5 ग्रॅमपेक्षा कमी वजनाची आढळून आली. त्यामुळे जिह्यातील वितरक वर्धमान एंटरप्रायजेस यांच्यावर वैध मापनशास्त्र्ा विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली.

































































