
>> आरती देवगावकर
जगातल्या कोणत्याही कानाकोपऱयात बसून आज आपण जगभरातील पदार्थ पाहू, करू आणि खाऊ शकतो ते या यूटय़ूब चॅनेल्सच्या माध्यमातून. ही नव्याने सुरू झालेली परंपरा कधी लुप्त होईल असे वाटत नाही. उलट त्यात दिवसागणिक वाढच होत राहील. आपणही याचा आनंद घेऊ, नवनव्या यूटय़ूब चॅनेल्सना भेटी देऊन नवनवे पदार्थ पाहू आणि करायला शिकू.
‘मास्टर शेफ’ या शोचे अनेक चाहते आहेत. शोचा उल्लेख केला त्याचे ऑडिशनपासूनचे सगळे भाग मी पाहते आहे. अगदी वीस-बावीस वर्षांच्या मुलांपासून ते 75 वर्षांचे वय उलटून गेलेल्या आजींपर्यंत स्पर्धक यात येत होते. त्यातच एक होत्या ‘बा’! वयाची पंचाहत्तरी उलटून गेलेल्या या आजींना पाहून मला फार काwतुक वाटले. या आजी केवळ घरी निरनिराळे पदार्थ बनवतात असे नाही, तर त्या त्यांच्या ऑर्डर्सही घेतात हे त्यांच्या बोलण्यातून समजले. त्यांच्या नातवाच्या सांगण्यावरून त्यांनी या वयात आपले यूटय़ूब चॅनेल चालू केले, त्याचे सगळे तंत्र समजावून घेतले आणि आता त्या स्वतःच्या या चॅनेलवरून निरनिराळे गुजराती पदार्थ, जी त्यांची खासीयत आहे ते करून दाखवतात. या वयातील त्यांचा हा उत्साह आणि नवीन शिकण्याची आकांक्षा यांनी मला प्रभावित केले.
त्यांच्याचसारख्या एक पाठक आडनावाच्या मराठी आजी आहेत त्यांचादेखील ‘आपली आजी’ नावाचा यूटय़ूब चॅनेल आहे. त्यांनी त्यांच्या नातवाच्या हट्टासाठी त्याच्याबरोबर काम करायला मान्यता दिली आणि आज कित्येक लाख लोक त्यांच्या या चॅनेलला भेट देतात आणि त्यातून त्यांना उत्तम कमाईदेखील होत आहे. ही दोन उदाहरणे पाहिली आणि स्वयंपाककला कशी सर्वदूर पसरली आहे, त्याचे किती स्रोत आहेत हे पाहावे म्हटले तर लक्षात आले की, आज जगात लक्षावधी कुकरी शोज होत आहेत. मागे जेव्हा फक्त ‘दूरदर्शन’ होते आणि ‘झी’ हे ‘अल्फा’ नावाने नव्याने आले होते, तेव्हाही असे काही शोज होत होते. तरला दलाल यांचे काही कार्यक्रम पाहिल्याचे स्मरते आहे. मात्र, हे शो खऱया अर्थाने प्रसिद्धीला आणले ते ‘खाना खजाना’ या कार्यक्रमातून शेफ संजीव कपूर यांनी. त्यांचे हसतमुख व्यक्तिमत्त्व, समजावून सांगण्याची पद्धत यांनी समस्त महिला वर्गाला मोहिनी घातली होती. हा कार्यक्रम प्रसिद्धीला आल्यावर इतर वाहिन्यांवरदेखील या प्रकारचे कार्यक्रम चालू झाले. त्यातून अनेक शेफ, बल्लवाचार्य नावारूपाला आले किंवा असे म्हणता येईल की, या शोजनी मनोरंजन क्षेत्रात एक नवे दालनच उघडले.
पूर्वीच्या काळी आपापल्या घरांमधून मोठय़ा बायकांना काम करताना पाहून मुली आपोआप स्वयंपाक शिकत असत. त्यानंतर मग आजूबाजूच्या शेजारणी, मैत्रिणी यांच्या घरच्या काही स्पेशल रेसिपी असतील तर त्या शिकण्याची खटपट करत. हळूहळू मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढू लागले आणि आपसूकच त्यांचा स्वयंपाकघरातील वावर कमी होऊ लागला. निरीक्षणाने शिकण्याचे प्रमाण कमी झाले. कित्येकदा अगदी रोजच्या जेवणापुरता स्वयंपाक येणेही मुश्कील होऊ लागले. शिक्षण संपताच बोहल्यावर चढलेल्या मुलींची सासरी गेल्यावर पंचाईत होऊ लागली. काही वेळा नवऱयाबरोबर वेगळय़ा गावी संसार थाटायची वेळ आली तर मग फारच हवालदिल होऊ लागल्या. अशा वेळी मदतीला धावून आली ती पदार्थांची पुस्तके. या पुस्तकांच्या मदतीने कित्येक पिढय़ांतील मुलींनी ‘सुगरण’ पदापर्यंतचा प्रवास सुकर केला. काळानुरूप बदल झाले. मुलींबरोबरच मुलांनाही स्वयंपाक येणे ही गरज भासू लागली. त्यांनाही या पुस्तकांनी तारले.
जसजशी तंत्रज्ञानात प्रगती झाली तसतसे याही क्षेत्रात परिवर्तन दिसून येऊ लागले. वर म्हटले तसे एक-दोन कार्यक्रमांतून सुरू झालेला हा प्रवास आज अगणित शोजपर्यंत जाऊन पोहोचला आहे. एक विशिष्ट थीम घेऊन त्या पद्धतीचा स्वयंपाक, उदा. ‘राजा, रसोई और अन्य कहानियां’ यात राजघराण्यांच्या रेसिपी, विस्मृतीत गेलेले पदार्थ, एखाद्या प्रदेशातील पदार्थ आणि अशी कितीतरी मोठी यादी करता येईल, अशा प्रकारचे कार्यक्रम, यूटय़ूब चॅनेल आज पाहायला मिळतात. एखादा विशिष्ट पदार्थ करायचाअसेल तर सर्च बारवर त्याचे नाव टाकले की, अनेक लोकांनी बनवलेल्या त्या पदार्थाच्या रेसिपीचे व्हिडीओ समोर येतात.
यात ‘निशा मधुलिका’, ‘हेब्बार्स किचन’, ‘मधुराज रेसिपीज’, ‘रणवीर ब्रार शो’ यांसारख्या सेलिब्रिटींच्या शोजबरोबर ‘लताज किचन’, ‘प्रियाज किचन’सारख्या कित्येक गृहिणींच्या यूटय़ूब चॅनेल्सचा समावेश आहे. अशी पैक यूटय़ूब चॅनेल सुप्रसिद्ध आहेत. हल्ली गावाकडील रेसिपी दाखवताना तिथले वातावरण, जुन्या पारंपरिक पद्धतीने वाटण-घाटण करून केलेले पदार्थ पाहण्यात येतात. आवड म्हणून, कधीतरी सहज वेळ घालवायला म्हणून ही यूटय़ूब चॅनेल्स पाहणे हे मनोरंजनाबरोबरच ज्ञानात भर घालणारे ठरते. दाक्षिणात्य पदार्थांत इडली, डोसा, उत्तपा, अप्पम यांच्या पलीकडे केवढा तरी मोठा प्रदेश आहे हे इथेच समजते आणि हॉटेलमध्ये खाल्ल्या जाणाऱया पंजाबी पदार्थांपेक्षा खरे पंजाबी पदार्थ वेगळेच असतात याचे ज्ञानही इथेच प्राप्त होते. नव्या पिढीला आकर्षण वाटते अशा पास्ता, पिझ्झा यांच्या बरोबरीने इटालियन, मेक्सिकन, अरेबिक, तुकाa आणि असेच इतरही… जगभरातील क्युझिन इथे तुमच्यासाठी उपलब्ध असते. कित्येकदा त्या त्या देशात मिळणारे घटक पदार्थ दुसरीकडे मिळतीलच याची खात्री नसते. अशा वेळी आपल्या देशात त्या साहित्याशी मिळते जुळते कोणते पदार्थ वापरता येतील याच्या टिप्सही याच चॅनेलवरून दिल्या जातात. त्यामुळे देशी तडका देत परदेशी पदार्थ करणे सोपे झाले आहे.
पूर्वीही आई थालीपीठ, पराठा यातून नावडत्या भाज्या शिताफीने मुलांच्या पोटात घालत असे. ही वेगवेगळी चॅनेल्स पाहताना जाणवले की, याबाबतीत जगभरातील ‘आई’ जमात सारखीच असते. फास्ट फूड देतानाही त्यातल्या त्यात मुलांच्या आरोग्याचा विचार करतेच ती. पारंपरिक पद्धतीने पदार्थ बनवताना प्रत्येक व्यक्तीची आपली अशी काही खासीयत असते. त्यामुळे त्या पदार्थाला वेगळे स्वरूप मिळते किंवा एखादा पदार्थ त्या व्यक्तीची सिग्नेचर रेसिपी बनून जातो. ही यूटय़ूब चॅनेल्स पाहताना अशा लहानमोठय़ा टिप्स करणारी व्यक्ती सांगत असते आणि त्या नीट ऐकून जिन्नस बनवला तर तो चुकण्याची शक्यता अगदीच कमी होऊन जाते.
(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)
[email protected]


























































