लोकल प्रवाशांचे आज मेगाहाल! तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वे मार्गाबरोबरच मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील तांत्रिक आणि अभियांत्रिकी कामासाठी  उद्या, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आठवडय़ाची सुट्टी असल्याने आपल्या कामासाठी घराबाहेर पडणाऱया लोकल प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल होणार आहेत.

पश्चिम रेल्वेकडून सांताक्रुझ आणि गोरेगावदरम्यान जलद अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10 ते सायंकाळी 3 वाजेपर्यंत पाच तासांचा  जम्बो ब्लॉक असणार आहे. त्यामुळे अनेक गाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत, तर काही जलद गाडय़ा गोरेगाव-सांताक्रुझदरम्यान धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत सुटणाऱया धिम्या मार्गावरील गाडय़ा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार असून त्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 या वेळेत अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड-माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे धिम्या मार्गावरून प्रवास करणाऱयांची मोठी कोंडी होणार आहे.

हार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱया अप आणि डाऊन मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तसेच पनवेल-ठाणे अप आणि डाऊन मार्गावरील सेवाही बंद असणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी भागात विशेष लोकल धावतील.