बोर्डाची परीक्षा : इज्जत का सवाल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अजित कवटकर, [email protected]

पालकांच्या पाल्याकडून मोठय़ा अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. एखाद्या प्रगतीशील उद्दिष्टासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याच्या गुणांना मुलांमध्ये रुजविण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहणेदेखील चुकीचे नाही. मात्र तसे करूनदेखील पाल्याला अपेक्षित यश प्राप्त करता आले नाही तरी जे काही प्राप्त झाले असेल त्याचे मनापासून काwतुक करणे आवश्यक आहे. तथापि मुलाची बोर्डाची परीक्षा ही जणू आपल्या इज्जतीचा सवाल आहे असा दृष्टिकोन ठेवून जर पालक त्या विद्यार्थ्यावर अपेक्षांचा डोंगर लादणार असतील तर विद्यार्थ्यासाठी सगळेच महाकठीण होईल.

आजच्या ‘चिल ब्रो’ जनरेशनमधील दहावी / बारावीच्या परीक्षेला बसणाऱया ‘कुल डुड’पेक्षा त्याचे पालकच अधिक तणावाखाली बेहाल झालेले जाणवतात. याचा अर्थ असा नव्हे की, हा बोर्डाचा विद्यार्थी परीक्षेचे टेन्शन घेतच नाही. पूर्ण अभ्यास झाला असेल तर मग भीती कसली! परंतु आजच्या जिवघेण्या कटऑफ युगात किती जरी अभ्यास केला तरी काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत असल्यामुळे, थोडं का होईना, पण दडपण येणं साहजिक आहेच. परंतु या ताणतणावाची तुलना विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकांत बोर्डाची परीक्षा देणाऱया त्या पिढीतील विद्यार्थ्यांशी केल्यास फरक नक्कीच जमीनआसमानाचा असेल. आज नापास होणं कठीण आहे, एवढा दिलदार व सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन ठेवून पेपर सेट आणि चेक केले जातात आणि म्हणूनच नव्वदहून अधिक टक्के संपादन करणाऱयांची संख्या शेकडय़ात नव्हे तर लाखांच्या जवळ असलेल्या हजारात असते. अर्थात हा पल्ला गाठण्यासाठी भरपूर मेहनत व हुशारी लागते यात वादच नाही, पण त्या जमान्यात पास होणं देखील शाबासकीस पात्र ठरायचं आणि नव्वदीपार जाणाऱयांकडे अतिमानवी बौद्धिक शक्ती असल्यासारखे पाहिले जायचे, इतका कठीण तेव्हाचा पेपर पॅटर्न व तपासणी असायची. असे असतानादेखील परीक्षेचा ताण सहन करण्याची, झेपण्याची क्षमता तेव्हाच्या विद्यार्थीदशेत अधिक होती. किंबहुना, असहाय्यतेची जाणीव निर्माण करणाऱया त्या नकारात्मक तणावाला सकारात्मकतेची प्रेरणादायी स्फूर्ती देण्याची किमया त्या जडणघडणीत होती. मग आता परिस्थिती अशी काय बदलली आहे की आजची मुलं शैक्षणिक अपयशापुढे कमकुवत होऊन, तो पराभव जिव्हारी लावून, अगदी टोकाचे पाऊल उचलण्याची हतबलता दाखवतात, चुक करतात?

अक्षरशः दशांशांच्या फरकाने प्रवेश हुकतो इतकी आजची स्पर्धा अतितटीची झाली आहे. एक प्रकारे करा किंवा मरा परिस्थितीच. एका जागेसाठी हजारो इच्छुक. अॅडमिशनच्या मागणीच्या तुलनेत त्याचा पुरवठा पैक पटींनी कमी. त्यात चांगल्या गुणवत्तेसाठी नावाजलेल्या शिक्षण संस्थांची संख्या खूपच कमी. या सगळ्याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. अशा परिस्थितीत परफॉर्मन्स प्रेशर आजच्या महागाईप्रमाणे वाढतच राहते. त्यात जर पालकांची महत्त्वाकांक्षा ही त्या पाल्याच्या उद्दिष्ट क्षमतेपेक्षा अधिक हट्टाला पेटली असेल तर मग तो विद्यार्थी सर्व बाजूंनी तणावात येणे क्रमप्राप्त आहे. ‘शैक्षणिक श्रेष्ठत्वाविना जीवन व्यर्थ आहे,’ अशा सुनियोजित नरेटिव्हचा अगदी बालपणापासून घरातून होणारा भडीमार हा मनात परीक्षेविषयी एक भीती निर्माण करतो. ही मानसिकता जरी संसर्गजन्य असली तरी त्याची लागण सर्वांनाच होते असे नाही. परीक्षेला आव्हान म्हणून बघणाऱयांची सखोल आणि संपूर्ण पूर्वतयारी मात्र याला आत्मविश्वासाने सामोरे जाते आणि यात अपेक्षेहून अधिक यशस्वी होते. वर्षाच्या अगदी सुरुवातीपासून किंवा त्याच्याही अगोदरपासून एक अभिमानास्पद उद्दिष्ट समोर ठेवून केला जाणारा व त्याच्या पूर्णत्वासाठी अखेरपर्यंत वचनबद्ध राहणारा कृतिशील संकल्प, वर्षभराच्या अभ्यासाचे काटेकोर नियोजन, अभ्यासाव्यतिरिक्त इतर सगळ्यापासून अलिप्तता, प्रत्येक विषयाचा सर्वांगीण सराव वगैरेचे सातत्य राखल्यास सफलता दिलखुलासपणे त्या मेहनतीवर मेहेरबान होते. परंतु इच्छित साध्य करूनदेखील आजच्या विद्यार्थ्याला त्या यशाच्या गोडीतदेखील अपयशाचा कडवटपणा जाणवत राहतो. का?

स्वतःच्या क्षमतेने गाठलेल्या उच्चांकाचा आनंद साजरा करण्याचे सोडून, इतरांनी टक्केवारीत गाठलेली अधिक उंची ही त्याच्यात पराभवाची भावना निर्माण करून ते त्याच्या विश्वासाला तडा देत, स्पर्धात्मक आव्हानांविषयी मनात न्यूनगंड निर्माण करत आहे. दुसऱयाशी तुलना करून स्वतःचा स्तर ठरविण्याची ही नकारात्मक सवय त्याच्या जडणघडणीला एक अभिशाप ठरू शकते. जिंकूनदेखील पराजित झाल्याची भावना निर्माण करणारी ही विचारसरणी आत्मविश्वास कमजोर करते. त्यातच त्याला घरातून वा मित्र मंडळीकडून खतपाणी घातले गेल्यास मनावरील निराशेचा मळभ अधिकाधिक गडद होत जातो व सदसद्विवेक बुद्धीला मारक ठरतो. परीक्षांमधून जरी हुशारीचा स्तर सिद्ध होत असला तरी या शैक्षणिक स्पर्धांमागील खरा उद्देश हा त्या परीक्षार्थीना आपल्या बौद्धिक क्षमतेचा पूर्ण वापर करायला लावून त्या मेहनतीला एक नियोजनबद्ध, शिस्तबद्ध, ध्येयबद्ध वळण लावणे आहे.

आज जरी परीक्षेतील गुणसंख्येवर हवी असलेली शिक्षण संधी मिळणे अथवा न मिळणे ठरत असले तरी, निकालाची पर्वा न करता आपली संपूर्ण क्षमता वापरून स्पर्धेला सामोरे जाण्याची सवय ही जीवनपद्धती म्हणून अंगवळणी पडणे आवश्यक आहे. कारण आज कमी टक्के मिळाले तरी पुढील आयुष्यात हा ‘100 टक्के प्रयत्नांचा सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच यशाची शिखरे गाठायला मदत करेल. पालकांनी आपल्या पाल्याकडून मोठय़ा अपेक्षा बाळगणे स्वाभाविक आहे; परंतु एखाद्या चांगल्या, प्रगतीशील उद्दिष्टासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याच्या गुणांना मुलांमध्ये रुजविण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहणे अधिक फलदायी ठरेल आणि तसे करूनदेखील अपेक्षित यश प्राप्त करता आले नाही तरी जे काही प्राप्त झाले असेल त्याचे मनापासून काwतुक करणे आवश्यक आहे. मात्र मुलाची बोर्डाची परीक्षा ही जणू आपल्या इज्जतीचा सवाल आहे असा दृष्टिकोन ठेवून जर पालक त्या विद्यार्थ्यावर अपेक्षांचा आणि दडपणाचा डोंगर लादून परिस्थिती हाताळणार असतील तर मग विद्यार्थ्यासाठी सगळेच महाकठीण होईल.

शालेय जीवनातील या महत्त्वाच्या परीक्षा टप्प्यांवर मिळालेले उल्लेखनीय यश हे पुढील प्रवासासाठी एक यशस्वी मार्ग मिळवून देण्यास सहाय्यक ठरते. असे असले तरी या परीक्षा म्हणजे काही जीवनाचे अंतिम सत्य नव्हे. यात अव्वल येणारा विद्यार्थी पुढील आयुष्यात सातत्याने तो उच्चांक टिकवून ठेवलेच असे नाही किंवा आता पाठी पडलेला उद्याच्या जगात आपले श्रेष्ठत्व सिद्ध करू शकणारच नाही असे नाही.

जगाचा इतिहास घडवणाऱयांमध्ये बहुतांश असे होते की, जे या पहिल्या पायरीवरच प्रतिकूल परिस्थितीमुळे डगमगले होते, परंतु त्यांचे त्यांच्या मेहनत व महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांप्रती असलेली प्रामाणिक निष्ठा ही कोणत्याही परिस्थितीत न डगमगणारी, न पराभूत होणारी होती आणि म्हणूनच त्यांनी त्या लज्जास्पद निकालाला आपली जीवन ओळख बनू दिली आहे आणि त्यातून यशाची, आदर्शाची एक अभिमानास्पद क्रांती साकारली. म्हणूनच केवळ आई-वडिलांच्या अट्टहासापोटी आणि स्वतःच्या मनाविरुद्ध अभ्यास करून नाईलाजामुळे परीक्षा देत असल्याची मानसिकता बाळगणारे आता काय, पण पुढेही कधी कोणत्याच क्षेत्रात वा विषयात उल्लेखनीय ठरत नाहीत, कारण इच्छाशक्तीशिवाय या जगात व जीवनात काहीच शक्य नाही. तेव्हा एखादी परीक्षा देणे भागच असेल तर त्यासाठीची तयारी ही एकाग्र चित्ताने, आवडीने, जिद्दीनेच झाली पाहिले. मग ती मेहनत जरी अपेक्षित यश मिळवून देण्यात कुठेतरी कमी पडली तरी तो प्रामाणिकपणा कोणत्याही प्रकारे वा दृष्टीने अपयशी ठरू शकत नाही. तो पुढे जाऊन कुठे ना कुठे जीवनाला फलदायी ठरेलच!