सण आयलाय गो होळीचा… एक गाव, एक होळीची शेकडो वर्षांपासून जपली जातेय परंपरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>वैभवी परब

फाल्गुन महिन्यात येणारा होळीचा सण म्हणजे उत्साह आणि जल्लोषाची पर्वणी. मैलामैलांवर परंपरा, मान, स्थान तसेच संस्कृतीचं प्रतीक राखत होळी साजरी केली जाते. शिमगोत्सव हा महाराष्ट्रातील कोळी समाजाचा महत्त्वाचा व आनंद साजरा करण्याचा सण. काळाच्या ओघात सर्वच सणांचे रूप बदलत असले तरी ठाण्यातील विटावा गावात आजही पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो. या गावात होळीची मजा आणि पारंपरिक थाट काही औरच! परंपरा आणि संस्कृती जपत गावातील ग्रामस्थांकडून ‘एक गाव, एक होळी’ची परंपरा यंदाही कायम ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. खरं तर प्रत्येक नाक्यावर, गल्लीबोळात होळय़ा पेटवल्या जातात, परंतु विटावा हे गाव असं आहे की, जिथे ‘एक गाव, एक होळी’ परंपरा जपताना सामाजिक एकोप्याचेही भान जपले जात आहे. त्याचेच फलित म्हणजे हे गाव गेली 103 वर्षे हा सण मोठय़ा उत्साहात साजरा करत आहे. या संपूर्ण गावात ही एकमेव होळी असते. त्यामुळे गावातील सगळे लोक एकत्र येत या आनंद लुटतात.

मासे आणि जिवंत खेकडय़ांनी होळीची सजावट
होळीदरम्यान कोळीवाडय़ांमध्ये वेगळेच उत्साहाचे वातावरण असते. होळीच्या दिवशी कोळी बांधव जांभळाच्या झाडाची होळी लावतात. जिथे होळी लावली जाते, त्या परिसरात रांगोळी काढली जाते. पताकांनी होळी सजवली जाते. आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा रोषणाईने झगमगतो. होळीवर विविध पदार्थांची सजावट करण्यात येते. ज्यात प्रत्येकाच्या प्रथेप्रमाणे कोणी मासे, तर कोणी जिवंत खेकडे, चॉकलेट असे पदार्थ लावून होळी सजवली जाते. घरात गोड पदार्थ केले जातात. घरी आलेल्या पाहुण्यांना गोडधोडाचे पदार्थ खाऊ घातले जातात. कोळी महिला आणि पुरुष पारंपरिक वेश परिधान करून नटूनथटून कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात.

जावईबापूंचा सत्कार

होळीला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. यसाठी नवविवाहित दांपत्याला पहिल्या होळी सणाला माहेरी बोलावून वाजत गाजत होळीला नारळ अर्पण करण्यासाठी नेले जाते. नवविवाहित जोडप्यांनी या होळीभोवती पाच फेऱया मारण्याची पद्धत आहे. होळी पेटविल्यानंतर सर्वप्रथम हे जोडपे प्रदक्षिणा घालतात आणि मग गावकरी कुटुंबासह होळीला नारळ वाहतात. विशेष म्हणजे गावकरी या दिवशी होळी सणाला आलेल्या नवदांपत्याला मान देत जावईबापूंचा जाहीर सत्कार करतात. त्यानंतर नवविवाहित जोडपी पारंपरिक पद्धतीने होलिकादेवीची पूजा करून पारंपरिक गाण्यांवर ताल धरतात, अशी माहिती कोळी ग्रामसेवक समिती (ट्रस्ट) अध्यक्ष भगवान भिवा पाटील यांनी दिली.

– [email protected]