
पीएफ खातेधारक जमा केलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजाच्या प्रतिक्षेत आहे. आर्थिक वर्ष संपायला कमी दिवस शिल्लक असून पीएफ धारकांच्या खात्यावर मात्र व्याज जमा झालेले नाही. खातेधारक ट्विटरवर ईपीएफओकडे तक्रार करत आहेत. अशाच एका तक्रारीवरुन ईपीएफओने व्याज रकमेबाबत उत्तर दिले आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.1 टक्के व्याज निश्चित केले आहे.
ट्विटरवर प्रतिक्रिया देताना ईपीएफओने सांगितले की, व्याजाची रक्कम ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते लवकरच तुमच्या खात्यात दिसेल. व्याजाच्या रकमेचे पेमेण्ट पूर्ण केले जाईल. खातेदाराचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. 6.5 कोटी लोकांची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून खातेदारांना पीएफच्या व्याजाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. पीएफ नियमांमधील बदलाबाबत बोलताना, 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करताना सरकारने ईपीएफचे पैसे काढण्याबाबत दिलासा दिला होता. नवीन नियमानुसार आता पीएफमध्ये जमा केलेले पैसे काढण्यावर टीडीएस कपात 30 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आली आहे. जर एखाद्याचे पॅनकार्ड ईपीएफओच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केलेले नसेल, तर त्याला पैसे काढल्यावर 30 टक्के दराने टीडीएस भरावा लागत होता.
मार्च 2022 मध्ये पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेवर मिळणारे व्याज दर 8.5 टक्क्याहून 8.1 टक्के केले आहे. हे जवळपास 40 वर्षातील सगळ्यात कमी व्याजदर आहे. याआधी 1977-78 मध्ये व्याजदर 8 टक्के ठरवण्यात आला होता. यानंतर 8.25 टक्क्याहून अधिकच राहिले. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 8.65 टक्के , 2017-18 मध्ये 8.55टक्के, 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि आर्थिक वर्ष 2015- 16 मध्ये 8.8 टक्के व्याज मिळत होते. कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पगारावर 12 टक्के कपात ईपीएफ अकाऊंटसाठी केली जाते. कर्मचाऱ्याचा पगारात केलेल्या कपातीचा 8.33 टक्के ईपीएस (कर्मचारी पेन्शन योजना) मध्ये 3.67 टक्के ईपीएफ मध्ये पोहोचतात. आपल्या खात्यात येणारे व्याजाच्या पैशांबाबत माहिती मिळविण्यासाठी सरकारने अनेक पर्याय दिले आहेत.























































