
लग्नाच्या दिवशी आपण सर्वात सुंदर दिसावे असे प्रत्येक वधूचे स्वप्न असते. त्यामुळे लग्न जवळ येताच वधू चांगल्या ब्युटी पार्लरचा शोध घेतात. याच मेकअपमुळे कर्नाटकातील एका वधूला थेट आयसीयूमध्ये भरती व्हावे लागले आहे. इतकेच नव्हे तर लग्नाचा मुहूर्तदेखील पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. वधूच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी पार्लरच्या ब्युटीशियनला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
कर्नाटकमधील अर्सिकेरे शहरामधील जबां जजूर गावामधील ही घटना आहे. दहा दिवसांपूर्वी वधूने एका हर्बल ब्युटी पार्लरमधून मेकअप करून घेतला. ब्युटी पार्लरच्या संचालकाने तिला नवीन प्रकारचा मेकअप सुचवला. वधूनेदेखील त्याला होकार दिला. फाऊंडेशनच्या सुरुवातीच्या लेयरनंतर लगेच तिने स्टीम मशीनमधून वाफ घेतली. काही वेळातच अॅलर्जीमुळे तिचा चेहरा सुजला आणि काळवंडला. त्यामुळे वधूला लग्नाच्या मंडपाऐवजी थेट आयसीयूमध्ये जावे लागले. वर पक्षाला याची माहिती मिळाल्यानंतर लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.


























































