
‘म्हाडा’च्या मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींसाठी लागू करण्यात आलेली भाडेवाढ शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जोरदार मागणीमुळे अखेर रद्द करण्यात आली आहे. यामुळे हजारो सर्वसामान्य रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे रहिवाशांना दरमहा जुन्या नियमानुसार केवळ 250 रुपयेच भरावे लागणार आहेत.
‘म्हाडा’च्या उपकरप्राप्त इमारतींमध्ये राहणाऱया रहिवाशांकडून 250 रुपये भाडे दरमहा आकारले जात होते. मात्र या घरांच्या देखभालीसाठी दोन हजार रुपये खर्च येत असल्याचे सांगत सुमारे अडीच पटींनी भाडे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आधीच महागाईने होरपळणाऱया सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा पडणार होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी भाडेवाढ रद्द करण्याची मागणी केली. ‘म्हाडा’च्या उपकरप्राप्त इमारतींच्या दुरवस्थेकडेही त्यांनी लक्ष वेधले. या इमारतींमधील घरे 160, 180 ते सवादोनशे चौरस फुटांची आहेत. ‘म्हाडा’ने या घरांचे बांधकाम निकृष्ट केल्यामुळे या गळक्या घरांची अवस्थाही दयनीय झाली आहे. त्यामुळे या इमारतींचा तातडीने पुनर्विकास करणे गरजेचे असताना ‘झिजिया कर’ कसा लावता, असा सवाल करीत भाडेवाढ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव भाडेवाढ रद्द केल्याची घोषणा करून पुनर्विकासाचे धोरण विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणण्यात येईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, आमदार रवींद्र वायकर यांनी बिंबिसार नगरमधील संक्रमण शिबिराच्या पुनर्विकासाचा प्रश्न उपस्थित केला. अॅड. आशीष शेलार यांनीही या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
वसुलीच्या नोटिसा मागे घ्या
– ‘म्हाडा’च्या इमारतींमधील रहिवाशांकडून थकीत घरभाडे दंडासहित भरण्यासाठी ‘म्हाडा’कडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गिरगाव, वरळी, लोअर परळ येथील वीस हजार कुटुंबीयांना या नोटीस बजावून घरभाडे दंड व करासहित भरा, अन्यथा घरे खाली करा असे सांगण्यात आले आहे. याबाबत आमदार अमीन पटेल, संजय पोतनीस आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित करून नोटिसा मागे घेण्याची मागणी केली.
पुनर्विकासाच्या गतीसाठी वाढीव एफएसआय द्या!
– पुनर्विसासाठी सरकारने ‘33/44’ हे नवे धोरण आणले आहे. मात्र ‘म्हाडा’च्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास याअंतर्गत होऊ शकत नसल्याचे गटनेते अजय चौधरी यांनी निदर्शनास आणून दिले. पुनर्विकासाला गती देण्यासाठी प्रोत्साहनपर ‘एफएसआय’ द्या, अशी मागणीही त्यांनी केली.
n यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘33/44’ची पॉलिसीची पडताळणी करून आवश्यकता भासल्यास बदल केले जातील असे आश्वासन दिले. शिवाय घरभाडे ऑफलाइन भरण्याबाबतही विचार करण्यात येईल, असे ते म्हणाले.





























































