लोणंद शहराच्या बाजूने होणार रिंग रोड, नव्याने प्रारूप विकास आराखडा तयार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोणंद शहराचा नव्याने प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तो एक महिन्याच्या आत प्रसिद्ध केला जाणार आहे. लोणंदच्या विकास आराखडय़ात शहराच्या बाजूने 30 मीटर रुंदीचा रिंग रोड काढण्यात येणार आहे. बालवाडी, प्राथमिक शाळा, दवाखाना, खेळाचे मैदान, पार्किंग, पाणीपुरवठा, घनकचरा प्रकल्प, सांडपाणी प्रकल्प, सांस्कृतिक केंद्र, अग्निशमन स्टेशन, सार्वजनिक सुविधा यासाठी आरक्षण टाकण्यात येणार आहे. या विकास आराखडय़ावर नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्या नगरपंचायतीकडे लेखी स्वरूपात द्याव्यात, असे आवाहन सहायक संचालक संजय साकला यांनी केले.

लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात विकास आराखडय़ाबाबत आयोजित बैठकीत साकला बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

साकला म्हणाले, पुढील 25 वर्षांचा विचार करून विकास आराखडा तयार करण्यात येणार असून, तो अंतिम टप्प्यात आला आहे. नागरिकांच्या सूचना घेऊन एक महिन्याच्या आत लोणंद नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत विकास आराखडा जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर त्यावर नागरिकांच्या हरकती मागवून समितीच्या पुढे सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर विकास आराखडा अंतिम करण्यात येणार आहे.

विकास आराखडय़ाबाबत विनोद क्षीरसागर, डॉ. नितीन सावंत, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर, सचिन शेळके, राजेंद्र डोईफोडे, राहुल घाडगे, ऍड. सर्फराज बागवान, नीलेश शेळके, म्हस्कूअण्णा शेळके, ऍड. गणेश शेळके, हर्षवर्धन शेळके, तारिफ बागवान, नंदकुमार खरात, संदीप शेळके, जावेद पटेल यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.