गिलचे दमदार शतक; कोहली शतकाकडे! हिंदुस्थानचे ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर, चौथी कसोटी अनिर्णितावस्थेकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यजमान हिंदुस्थानने चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱया दिवशी पाहुण्या ऑस्ट्रेलियावर जोरदार पलटवार केला. ऑस्ट्रेलियाच्या 480 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानने 99 षटकांत 3 बाद 289 धावसंख्येपर्यंत मजल मारली. सलामीवीर शुभमन गिलने (128) दमदार शतक झळकावत आपली निवड सार्थ ठरवली. दुसरीकडे विराट कोहलीनेही नाबाद 59 धावा करीत शतकाच्या दिशेने कूच केली आहे. जगभरातील चाहते आता त्याच्या शतकाकडे डोळे लावून बसले आहेत. तिसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा रवींद्र जाडेजा 16 धावांवर कोहलीला साथ देत होता. या लढतीत हिंदुस्थानी संघ अजूनही 191 धावांनी पिछाडीवर आहे. दोन दिवसांचा खेळ शिल्लक असल्याने ही कसोटी अनिर्णितावस्थेकडे झुकल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दृष्टिक्षेपात…

– जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलने तीन महिन्यांत हे पाचवे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याने या वर्षी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत लक्षवेधी कामगिरी करीत शतके ठोकली. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेटविश्वातील पहिला फलंदाज ठरला.
– विराट कोहलीने तब्बल 14 महिने आणि 15 डावांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्याने 11 जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरची अर्धशतकी खेळी केली होती.
– धावफलक – ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 480 धावा.
हिंदुस्थान पहिला डाव ः रोहित शर्मा झे. लाबुशेन गो. कुहेनमन 35, शुभमन गिल पायचीत गो. लायन 128, चेतेश्वर पुजारा पायचीत गो. मर्फी 42, विराट कोहली खेळत आहे 59, रवींद्र जाडेजा खेळत आहे 16.
अवांतर ः 9; एकूण ः 99 षटकांत 3 बाद 289 धावा. बाद क्रम ः 1-74, 2-187, 3-245. गोलंदाजी ः मिचेल स्टार्क 17-2-74-0, पॅमेरून ग्रीन 10-0-45-0, नाथन लायन 37-4-75-1, मॅथ्यू कुहनेमन 13-0-43-1, टॉड मर्फी 22-6-45-1.