धक्कादायक… ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती खालावली, दीपक केसरकर यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून राज्यातील ग्रामीण भागांतील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती खालावली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विशेषकरून जळगाव जिल्ह्यामधील तिसरी ते पाचवीच्या फक्त 22 टक्के मुलांना वाचता येत असून 80 टक्के मुलांना वजाबाकीदेखील करता येत नाही. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या 45 टक्के विद्यार्थ्यांची मराठी व इंग्रजी वाचनक्षमताही कमी झाली आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेने केलेल्या ऍन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट सर्वेक्षणातून राज्यातील ग्रामीण भागांतील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती खालावल्याचे जानेवारी 2023 मध्ये निदर्शनास आल्यासंदर्भात विधानसभेचे सदस्य अतुल भातखळकर, शिरीष चौधरी, अमीन पटेल, अशोक चव्हाण आदी सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी होकारार्थी उत्तर दिले आहे.

राज्यात विशेषतः ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता सुधारण्याकरिता इयत्ता दुसरी ते दहावीसाठी सेतू अभ्यास राबविण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते पाचवी भाषा व गणित विषयासाठी कार्यपुस्तिका, छापील पूरक अध्ययन साहित्य तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षणामुळे शिक्षकांना अध्ययन निष्पतीनिहाय कृती आराखडा तयार करणे शक्य झाले आहे, असा दावाही मंत्री केसरकर यांनी आपल्या उत्तरातून केला आहे.