…त्यामुळे अब्दुल सत्तार यांची बेताल वक्तव्य वाढत आहेत; भास्कर जाधव यांचे टिकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता शेतकऱ्यांबाबत अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त विधान केले आहे. शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे असंवेदनशील वक्तव्य सत्तार यांनी केले आहे. त्यांच्या विधानानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवसेनेचे ( उद्धव बाळासहेब ठाकरे ) आमदार भास्कर जाधव यांनीही सत्तार यांच्यावर टीकास्र डागले आहे.

अब्दुल सत्तार अशाच पद्धतीने बेताल वक्तव्य करत आहेत. शेतकऱ्यांबाबत त्यांना प्रेम, आत्मीयता, सहानभुती नाही आणि शेतकऱ्यांची काळजीही नाही. स्वत:च्या कामाने राज्य नावारूपाला येणार नाही, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे कधी महिलांबद्दल अश्लाघ्य बोलतात, शेतकऱ्यांबाबत बोलतात, अधिकाऱ्यांना दारू पिता का म्हणून विचारतात, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी सत्तार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

शेतकऱ्यांवर एवढे मोठे संकट आले आहे. अवकाळी पाऊस पडल्यानंतर अब्दुल सत्तार कुठे बांधावर दिसले का? म्हणून वायफळ बडबड, शेतकऱ्यांची टिंगळटवाळी करणे, जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग अब्दुल सत्तार नेहमी करतात. त्यांना मुख्यमंत्री आवर घालत नाही. त्यामुळे त्यांची बेताल वक्तव्य दिवसेंदिवस वाढत चालली आहेत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. अब्दुल सत्तार आणि राज्य सरकार हे असंवेदनशील आहे. कृषीमंत्र्यांनी वेळोवेळी असंवेदनशीलपणा दाखवला असून शेतकऱ्यांच्याबाबत त्यांची भाषा ही दिलासादायक नाही, असे ते म्हणाले आहेत.