
ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज आणि यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्ट जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू ठरला आहे. ऑस्ट्रेलियाला तीन जगज्जेतेपद जिंकून देणारा गिलख्रिस्टने 15 वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आंतरराष्ट्रीय मासिक ‘सीईओ’ने नुकत्याच जाहीर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत गिलख्रिस्टला पहिल्या क्रमांकावर ठेवले असून त्याच्याकडे 380 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 3200 कोटी रुपये) इतकी संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दुसऱया क्रमांकावर असून त्याची संपत्ती 170 दशलक्ष डॉलर्स (1400 कोटी) असल्याचे म्हटले आहे.
‘सीईओ’ मॅगझिनने जाहीर केलेल्या यादीत अॅडम गिलख्रिस्टचे नाव अव्वल स्थानी पाहून सर्वांचे डोळे चक्रावले. सध्या गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी कॉमेंटेटर म्हणून सक्रिय आहे. त्याने आपल्या 12 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत अत्त्युच्च दर्जा खेळ करीत भन्नाट यष्टिरक्षणासह आक्रमक फलंदाजीही केली होती. तो काही काळ ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधारही होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गिलाख्रिस्टच्या निम्मी संपत्तीही जगात एकाही क्रिकेटपटूकडे नाही.
टॉप टेनमध्ये पाच श्रीमंत हिंदुस्थानचेच
जरी हिंदुस्थानी क्रिकेटपटू श्रीमंताच्या यादीत अव्वल नसला तरी टॉप टेन श्रीमंतांपैकी पाच श्रीमंत हिंदुस्थानी क्रिकेटपटूच आहेत. सचिन तेंडुलकर दुसऱया क्रमांकावर असून त्याने सुमारे 1400 कोटींची संपत्ती उभारली आहे. गिलख्रिस्ट आणि सचिनच्या श्रीमंतीत तब्बल 1800 कोटी रुपयांचे अंतर आहे. सचिननंतर धोनीकडे 950 कोटी, तर विराट कोहलीकडे 920 कोटींची संपत्ती असल्याचे या मॅगझीनने म्हटले आहे. तसेच वीरेंद्र सेहवाग (330 कोटी) आणि युवराज सिंग (290 कोटी) यांनीही टॉप टेनमध्ये स्थान मिळविले आहे.




























































