
दिलीप जोशी << [email protected] >>
साहित्यक्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवणारे मंगेश पाडगावकर समस्त महाराष्ट्राचे लाडके लेखक. पाडगावकरांच्या घरी जाऊन त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेण्याची संधी लाभली… काही कवींना त्यांच्या अनेक गीतांचं सुरेल ध्वनिमुद्रण होण्याचं भाग्य प्राप्त झालं. गदिमा तर सिनेगीतंच लिहीत होते, परंतु त्यांच्या ‘गीतरामायणा’ने महाराष्ट्राला तृप्त केलं. भा. रा. तांबे यांच्या पश्चात वसंत प्रभूंनी त्यांची कविता स्वरबद्ध केली. लतादीदींच्या स्वरात ती गीतं अमर झाली. जनकवी पी. सावळाराम यांची अनेक भावगीतं लता-आशा आणि अनेक गायकांनी गायिली. काव्यवाचनाचा प्रकार कवी मंडळींनी सुरू केला तो रविकिरण मंडळाच्या काळात. त्याचा दुसरा टप्पा म्हणजे मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर. पाडगावकरांच्या घरी जाऊन त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेण्याची संधी मित्र रामनाथ आंबेरकर याच्यामुळे लाभली.
पाडगावकरांकडे जात असताना माझ्या कळत्या वयापासून आमच्या राजावाडीतच येणारे पाडगावकर पाहिल्याचं आठवलं. पाडगावकरांची बहीण प्रभा परुळकर या आमच्या कॉलनीत राहायच्या. मला वाटतं त्या वेळी सोमय्या कॉलेजात काही काळ मराठीचे प्राध्यापक असलेले पाडगावकर साधारण दुपारच्या वेळी बहिणीकडे येत असत. आमच्या घरासमोरूनच ते जात असत. त्या वेळीही त्यांची ‘अशी पाखरे येती…’ सारखी अनेक गाणी गाजत होती. फ्रेंचकट दाढी राखणाऱ्या या चष्मेवाल्या माणसाकडे आम्ही मुलं कुतूहलाने पाहायचो.
मुंबईत शीव (सायन) येथे राहणारे कविवर्य नंतर अनेकदा भेटले. मी पत्रकारितेत आल्यावर ‘युसीस’च्या (युनायटेड स्टेटस् इन्फर्मेशन सर्व्हिस) ऑफिसात जयवंत दळवींना भेटायला केव्हातरी जात असे. ते तेव्हा आमच्या ‘श्री’ साप्ताहिकासाठी एक कादंबरी लिहीत होते. त्यानिमित्ताने किंवा त्यांच्या लेखाच्या संदर्भात या भेटी असायच्या, तर तिथेच लेखक रमेश मंत्री आणि मंगेश पाडगावकर बसलेले असायचे. एकदा विकास सबनीस आणि मी त्यांच्याकडे आमच्या दिवाळी अंकाच्या संदर्भात गेलो होतो. माझी चौकशी केली त्यांनी.
हे आठवत असतानाच पाडगावकरांचं घर आलं. तिथे त्यांचे चिरंजीव डॉ. अजितही होते. लहानपणी आमच्यात क्रिकेट खेळणारे! त्या आठवणींना थोडा उजाळा दिल्यानंतर रीतसर मुलाखत सुरू झाली. पाडगावकर सविस्तर सारं सांगत होते, ‘‘अरे, तुला माहितेय का? आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या माझ्या ‘बिल्हण’ या सांगीतिकेला संगीत कुणी दिलं होतं?’’
‘‘पु. ल. देशपांडे यांनी. त्यातलं तुमचं ‘शब्दावाचूनि कळले सारे, शब्दांच्या पलीकडचे’ हे जितेंद्र अभिषेकी यांनी गायिलेलं गाणं खूप गाजलं.’’
‘‘बरोबर. अरे, बरीच गाणी गाजली, पण पीएलचं संगीत काय! भाई म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.’’
त्यानंतर गोष्ट निघाली अरुण दातेंना ‘अरुण’ करणाऱ्या पाडगावकरांच्या गीताची. ‘शुक्र तारा मंद वारा’ हे अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी गायिलेलं गाणं रेकॉर्ड झालं तेव्हा ‘अरविंद दाते’ या गायकाचं नाव ‘अरुण दाते’ म्हणून जाहीर झालं ते समजुतीच्या घोटाळय़ातून, पण पाडगावकरांचं हे गाणं इतकं विक्रमी गाजलं की, दाते यांना ‘अरुण’ हे नाव बदलताच आलं नाही! या गाण्याचं संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं.
‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘भेट तुझी माझी स्मरते’, ‘माझे जीवनगाणे’, ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘लाजून हासणे अन्’, ‘तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे’, ‘असा बेभान हा वारा’, ‘जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली’, ‘जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा’, ‘धुके दाटले हे उदास उदास’, ‘परदेशी सजण घरी आले’, ‘नीज माझ्या नंदलाला’, ‘भावभोळय़ा भक्तीचीही एकतारी’, ‘मान वेळावुनि धुंद बोलू नको’, ‘श्रावणात घननिळा बरसला’, ‘सांग सांग भोलानाथ’ अशी पाडगावकरांची कितीतरी गाणी रसिकांच्या मनात रुंजी घालतायत.
पाडगावकरांनी व्यंगकाव्यही केलं. त्यांच्या वात्रटिका खूप गाजल्या. ‘उदासबोध’ही त्यांनी लिहिला. ठिकठिकाणी कार्यक्रम करताना या गीतांमागचे भन्नाट किस्से सांगून ते श्रोत्यांना गुंगवून ठेवत. आपले काव्यप्रवासातले सहकारी वसंत बापट आणि विंदा करंदीकर यांच्या आठवणीने त्यांना बेचैन वाटे, परंतु त्यांचे किस्से ते सांगत. आमच्या गप्पांमध्येही अशा अनेक मनोरंजक गोष्टी आल्या. गप्पा संपता संपता मी विचारलं, ‘‘तुमचं पूर्ण नाव?’’ किंचित हसून ते त्यांच्या त्या विशिष्ट स्वरात उद्गारले, ‘‘मंगेश केशव पाडगावकर’’ आणि म्हणाले, ‘‘अरे, एक गंमत आठवून हसू आलं. मी शाळेत असताना माझी आई एकदा म्हणाली, ‘मंगेशा, ती दामल्यांची कविता वाचून दाखव रे’, मी म्हटलं, ‘अशी कोणाचीच कविता नाही’, आई म्हणाली, ‘मग ‘तुतारी’ कविता कोणाची?’, ‘अगं, ती केशवसुतांची’, ‘तेच ते. मी यांचं नाव कशी घेणार!’’
मुलाखतीनंतर कर्जतला त्यांच्या जावयाच्या बंगल्यावर ठेवलेले त्यांचे अनेक पुरस्कारही पाहिले. त्यात साहित्य अकादमीचा पुरस्कार महत्त्वाचा होता.




























































