
पुण्याच्या राजकारणात गेली 40 वर्षे आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अजातशत्रू नेते खासदार गिरीश बापट यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. गिरीश बापट यांच्या निधनामुळे सर्वसमावेशक नेतृत्व हारपले, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल सर्वपक्षीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी गिरिजा, मुलगा गौरव आणि सून स्वरदा असा परिवार आहे.
गिरीश बापट यांचे पार्थिव त्यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी दुपारी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर वैपुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता. सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. आजारातून काहीसे बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी ऑक्सिजन सिलिंडर आणि नाकात नळय़ा असतानादेखील थेट कसबा गणपतीपुढील त्यांच्या कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. यामुळे कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले होते. त्यावेळी ‘पुण्याची ताकद, गिरीश बापट’ या घोषणेने परिसर दणाणून निघाला होता. त्यानंतर ते घरीच विश्रांती आणि उपचार घेत होते. त्यानंतर झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते तसेच मतदानदेखील केले.
गेल्या दोन-चार दिवसांपासून त्यांची तब्येत खालवल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यानंतर बापट यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले, मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले.
गिरीश बापट हे भाजपच्या जुन्या फळीतील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. पुण्यात भाजप वाढवण्यात गिरीश बापट यांचे महत्त्वाचे योगदान आहे. गिरीश बापट यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी उत्तम संबंध होते. कार्यकर्त्यांची एक चांगली फळी त्यांनी निर्माण केली. आणीबाणीच्या काळात गिरीश बापट यांना 19 महिन्यांचा कारावास झाला होता. ते नाशिक जेलमध्ये होते. 1973 मध्ये टेल्को पंपनीत काम करताना त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा आंदोलने केली. पुण्यातील प्रश्नावरही त्यांनी लढा दिला.
सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारा नेता
गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुŠखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली. – शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिलं जायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं. – अजित पवार, विरोधी पक्षनेते
खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कशाला म्हणतात हे बापट यांच्याकडे बघितल्यावर कळते. सर्व क्षेत्रांतील प्रचंड ज्ञान बापट यांना होते. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सलग पाच वेळा आमदार, खासदार, पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम पुणे कधी विसरू शकणार नाही. पक्षाच्या भिंतीपलीकडचे त्यांचे सर्व नेत्यांशी, पक्षांशी, समाजाशी त्यांचे चांगले संबंध होते. – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
गिरीश बापट यांच्यासमवेत गेल्या तीन दशकांपासून अधिक काळ परिचय होता. शिवसेना-भाजप युतीचे सरकार असतानाही सातत्याने संपका&त असत. 2014 नंतर ते पुण्याचे पालकमंत्री आणि लोकसभेचे खासदारदेखील झाले. या संपूर्ण कालावधीत त्यांनी पुणेकरांच्या असंख्य प्रश्न सोडवितानाच अष्टविनायक, पुणे शहरातील वाडे, संसदीय कार्यमंत्री असताना दोन्ही सभागृहांचा समन्वय त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केला होते. स्त्री आधार केंद्राच्या कार्यक्रमांनादेखील अनेकदा ते आले होते. महात्मा फुले संग्रहालयाच्या ठिकाणाहून त्यांचा सर्वांचा संपर्क होत असे. असा नेता, असा खासदार पुन्हा होणे नाही. – डॉ. नीलम गोऱहे, उपसभापती विधान परिषद
सर्वसमावेशक नेता…
राजकारणात गिरीश बापट हे ‘सर्वसमावेशक’ नेता अशी होती. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम साधून घेण्याचे कसब गिरीश बापट यांच्यामध्ये होते. सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष पुणे महानगरपालिकेत 1983 मध्ये पहिल्याच प्रयत्नात बापट नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले.
n गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी तळेगाव-दाभाडे येथे झाला.
n तळेगाव-दाभाडे येथे प्राथमिक शिक्षण.
n माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले.
n बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी.
n 1973 मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले.
नगरसेवक ते मंत्री आणि खासदार
बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यानंतर ते जनसंघातून राजकारण आले. संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. त्यांची राजकीय जीवनाची सुरुवात नगरसेवकपदापासून झाली. नगरसेवक-आमदार-मंत्री, पुणे जिह्याचे पालकमंत्री, खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
z ‘गिरीश बापट यांनी आयुष्यात अनेक निवडणुका लढवल्या. प्रत्येक निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपण किती मताने निवडून येऊ हे सांगायचे आणि तो आकडा त्यांच्या कार्यालयातील फलकावर लिहून खाली सही करायचे. विशेष म्हणजे हा आकडा मतमोजणीनंतर तंतोतंत जुळायचा. बापट यांचा हा शिरस्ता लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिला.
पुण्याची ताकद गिरीश बापट…
पुण्याच्या राजकारणात गिरीश बापट यांनी अढळ स्थान मिळवले. 1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली अन् पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले. निवडणूक काळात कसबा पेठ परिसरात ‘कुणी कितीही करा आदळआपट..,कसब्यात फक्त गिरीश बापट’, ‘पुण्याची ताकद गिरीश बापट…’ या घोषणांचे बॅनर नेहमी झळकलेले असायचे.
1996 साली त्यांना भाजपने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. यात त्यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती, मात्र पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु 2019 मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी वैयक्तिक जवळचे मित्र असलेले काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांचा पराभव केला.
100 टक्के उपस्थिती
आमदार आणि मंत्री असताना विधिमंडळात बापट यांचा पूर्णवेळ राबता असायचा. अधिवेशनाला शंभर टक्के पूर्णवेळ उपस्थिती असायची. विधानसभेचे रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू असले की सत्ताधारी आणि मंत्री विरोधी पक्षाच्या बाकांवरील आमदारांची संख्या कमी होण्याची वाट पाहायचे. विरोधी पक्षाचे सगळे आमदार निघून गेले तरी बापट हे दिवसभराचे कामकाज संपेपर्यंत सभागृहातच बसायचे. त्यामुळे सत्ताधाऱयांची कामकाज एकतर्फी रेटून नेण्याची संधी केवळ बापट यांच्यामुळे वाया जायची.



























































