परमेश्वर रथोत्सव दुर्घटना प्रकरण, पंच कमिटीवर हलगर्जीपणाचा ठपका; पाचजणांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे ग्रामदैवत परमेश्वरांचे रथोत्सव कार्यक्रमात रथ ओढताना चाक निखळून भक्तांवर पडल्याने दोनजण ठार झाल्याची घटना घडली होती. पंच कमिटीने योग्य खबरदारी न घेतल्याने हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, यात्रा कमिटीच्या पाचजणांवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री परमेश्वर देवाचे यात्रा पंचकमिटी सदस्य मल्लप्पा बसवणप्पा निरोळी, सिद्धाराम ईरप्पा बटगेरी, श्रीशैल बसवणप्पा दुर्गे, नागप्पा परमेश्वर घोळसगाव, शिवपुत्र धर्मण्णा धड्डे (सर्व रा. वागदरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

वागदरी येथे गेल्या 200 वर्षांपासून ग्रामदैवत परमेश्वर महाराजांचा रथोत्सव कार्यक्रम होत असतो. इतिहासात प्रथमच ही दुर्दैवी घटना घडली. परंपरेप्रमाणे यंदाही परमेश्वर पंचकमिटीने 26 मार्च रोजी सायंकाळी रथोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. याप्रसंगी मालगंबपर्यंत रथ ओढून परत मूळ ठिकाणी येताना चाक फटवणाऱया दोघांनी चाकाखाली दोन मोठे ओंडके दिल्याने ओंडक्यावरून रथ खाली जोरात आदळला. यामुळे रथाचे ऍक्सल तुटले आणि एक चाक निघून रथाचे चाक कटवणारा गंगाराम मंजूळकर (वय 65 वर्षे) व ईरप्पा गिरमल नंदे (वय 43) यांच्या अंगावर पडले. यात दोघांचाही मृत्यू झाला.

रथोतसवाप्रसंगी परमेश्वर देवस्थान पंचकमिटीने रथाची देखभाल, दुरुस्ती करणे व योग्य खबरदारी काळजी घेणे गरजेचे होते. पूर्वसूचना देऊनही हलगर्जीपणा करणाऱ्या पंचकमिटीतील पाचजणांवर उत्तर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जे. व्ही. कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सी. पी. पुजारी तपास करीत आहेत.