
>> माणिकराव खुळे
गेल्या तीन वर्षांपासून चांगल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई जनतेसहित शासन व सिंचन विभागाच्या विस्मरणात जाऊ शकते, परंतु एव्हाना भारतीय हवामान खात्याकडून ‘एल निनो’संबंधी पुसटसे का होईना, गोपनीय संकेत कदाचित मिळालेही असतील तर आता वेळीच उपाययोजना केल्यास भविष्यात येणाऱया पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करण्यास चांगलीच मदत होऊ शकते असे वाटते. म्हणजे आगाऊ व्यवस्था केली म्हणून बरे झाले, असे म्हणण्यास वाव मिळेल.
दर 4-5 वर्षांनी डोकावणारा ‘एल निनो’वर पिण्याच्या पाण्याचे दीर्घ स्वरूपाचे कायमचे उपायनियोजन सरकारकडून करून गांभीर्याने विचार होणे गरजेचे वाटते. ‘एल निनो’ शक्यतेच्या पार्श्वभूमीच्या कालावधीत 25 टक्क्यांपेक्षा कितीतरी अधिक पाणीसाठा बाष्पीभवनात आणि 30 टक्क्यांपेक्षा कितीतरी अधिक पाणी वहनात, गळतीत काही टक्के वाया जाणार असण्याची शक्यता असेल तर मग शेतीला देऊन एप्रिल-मे महिन्यात पिण्यासाठी धरणात किती पाणीसाठा शिल्लक राहू शकतो? म्हणून बाष्पीभवन वेग कमी करून, कालवा पाणी वहनातील त्रुटी दूर करून, सूक्ष्म सिंचन क्षेत्र वाढ करून या टंचाई वर्षात पाणीसाठा वाढवता येईल. नाहीतर ‘थेंबाथेंबाने साठवायचे, पूर आला की फुटून वाहू द्यायचे, म्हणजे वाया घालवायचे’ असे होईल. ‘एल-निनो’ पाणीटंचाई अवधीत माणसे, पशुपक्षी, प्राणी, जनावरांना पिण्यासाठी काय नियोजन करता येईल यावर सिंचन विभागाकडून विचार होणे गरजेचे वाटते.
मनात असा विचार येतो की, नदी जोड प्रकल्प किंवा कोकणातील पाणी पूर्वेकडे वळवण्याचे दोन मोठे पर्याय हाताशी असताना शासन वेगाने, प्राधान्याने या विषयावर हालचाल का करत नाही? ‘तहान लागल्यावर विहीर का खोदायची’? फक्त आपत्ती निधी वाढवून काय उपयोग? त्याबरोबर अशा पद्धतीच्या नियोजनाच्या उपाययोजना व्हाव्यात असे वाटते. अजून तर दुष्काळ, पाणीटंचाई हा विचार जनता, शासन यांना मनी शिवलेलाही मनी दिसत नाही. तरीही धरण साठय़ाची उपलब्ध टक्केवारी बाहेर येऊ लागली. आता कोठे दुष्काळाशी सामना करावा लागू शकतो. हा विचार मनी शिवू लागलाय असे वाटते. पाण्याची ओरड सुरू झाली आहे. खरं तर संभाव्य एल निनोच्या बातमीने तरी याअगोदरच विचार व्हायला हवा होता. ठीक आहे, अजून वेळ गेलेली नाही.
दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर साधारण कोलंबिया, इक्वेडोर देशांच्या पश्चिम किनारपट्टीवर, इतर अनेक कारणांबरोबरच विषुववृत्तादरम्यानच्या मध्य प्रशांत महासागराचे पृष्ठभागीय समुद्री पाण्याचे तापमान वाढून हवेच्या दाबाची पोकळी तयार होते. समुद्री पाण्याचा पृष्ठभाग उंचावतो. विषुववृत्त समांतर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरून पूर्व आशियाई देशाकडील मध्य प्रशांत महासागराकडे उष्ण पाण्याचे प्रवाह वाहू लागतात. त्यामुळे नैऋ&त्य मान्सूनला हिंदुस्थानी समुद्रावर चक्रीय वाऱयाच्या स्थिती निर्मिती होण्यासाठी अपेक्षित तयार होणारे कमी किंवा अति कमी, तीव्र कमी दाब क्षेत्रे तसेच प्रचंड आर्द्रतेचा हिंदुस्थानी भू-भागावर आवश्यक रेटा यांचा अभाव हे ‘एल निनो’त घडून येते असे ढोबळमानाने सांगता येईल. एकामागून एक पावसासाठी तयार होणाऱया अनुकूल प्रणाली बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात तयार होत नाही. केवळ आसामकडील राज्ये व तळकोकणात पाऊस पडतो व संपूर्ण देशभर वातावरण कोरडे असते व दुष्काळ स्थिती तयार होते.
सध्या ‘ला निना’ व आयओडी दोन्हीही तटस्थतेकडे जाऊ लागलेत. येत्या पावसाळी हंगामात (एन्सो- एल निनो साऊथ ओसिलेशन्स) एल-निनोकडे तर आयओडी धन अवस्थेकडे झुकू लागण्याचे संकेत जाणवू लागलेत. एक पावसासाठी धोकादायक तर एक पावसासाठी पूरक दिसतोय. येत्या तीन आठवडय़ांत त्याचे चित्र अधिक स्पष्ट होईलच .
या वर्षीच्या ‘एल निनो’चे वैशिष्टय़ असेही दिसते की, ‘एल निनो’ पावसाळी हंगामाच्या उत्तरार्धात कार्यरत असण्याच्या शक्यतेचे संकेत जाणवू लागलेत. म्हणजेच महाराष्ट्रात 4 महिन्यांच्या हंगामात नेमक्या त्याच काळात म्हणजे 1 ऑगस्टनंतर शेतीसाठी लाभदायी पाऊस होत असतो आणि त्याच वेळेस त्याची आवश्यकताही असते. परंतु जर एल-निनो या वर्षी कार्यरत झाला तर पाऊस होण्याच्या प्रक्रियेला बाधा येऊ शकते. तसेही आतापर्यंतच्या निरीक्षणावरून अलीकडच्या 10-15 वर्षांत अंदाजे सुरुवातीचे 30-40 दिवस मान्सूनचे आगमन उशिरा होणे, आला तरी त्याचा प्रवाह कमकुवत जाणवणे, अशा घडामोडीतून महाराष्ट्रात पाऊस विशेष झालेला दिसत नाही. म्हणजेच या वर्षी ‘एल निनो’चा धोका व नेहमीचे मान्सून आगमन वर्तन पाहता या एकत्रित परिणामातून कदाचित संपूर्ण 4 महिनेही पावसासाठी मुकावे लागू शकते. म्हणजेच दुष्काळाशी सामना करावा लागू शकतो.
समजा मान्सून आगमन वेळेवर झाले आणि त्यातून तुटपुंजा जलसाठा धरणात उपलब्ध झाला तर दुष्काळाशी सामना करायची वेळ येईल. अशावेळी आताच केलेली पेयजलाची काटकसर पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेला हातभार लावू शकते. तेव्हा पाणी नियोजन आतापासूनच करावयास हवे.
परंतु असे असले तरी संपूर्ण 4 महिन्यांच्या पावसाळी हंगामात आयओडी धन अवस्थेकडे झुकण्याची शक्यतेचे संकेतही जाणवू लागलेत आणि तसे घडले तर मात्र हिंदुस्थानसाठी त्याची ती अवस्था अनुकूलही ठरू शकते. म्हणजेच हिंदुस्थानसहित जगासाठी 2023 ला जरी ‘एल निनो’ अवतरला तरी हिंदुस्थानसाठी धन आयओडी हा हिंदुस्थानचा ‘ला निना’ म्हणून 2023च्या मान्सून कालावधीत पाठीशी उभा राहू शकतो. म्हणून तर धन आयओडी हा हिंदुस्थानसाठीचा ‘ला निना’ मानला जातो, परंतु याला तूर्त तरी ‘जर तर’चे कंगोरे आहेत. नेहमीप्रमाणे यासंबंधीचे चित्र येत्या तीन आठवडय़ांत भारतीय हवामान खात्याकडून स्पष्ट होण्याची शक्यता आहे आणि याच एका शक्यतेवर काही जण ओरडू लागलेत, “ या वर्षीही खूप पाऊस पडणार आहे.’’ ग्रामीण भागातील म्हणीप्रमाणे त्यांचे ‘लागो भागो तीन टोले’. काहीही होवो, पण बोलून मोकळे व्हायचे !
यंदाच्या संभाव्य ‘एल निनो’ संकटाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाशी सामना करताना असेही विवेचन करावेसे वाटते की, राज्य जल आराखडय़ात तापी खोऱयातील गुजरातमधील उकाई धरणात वाहून जाणारे हक्काचे 100 टीएमसी पाणी अडवणे, अरबी समुद्रात वाहून जाणारे दमणगंगा, नारपार खोऱयातील पाणी दुष्काळी मराठवाडा व नाशिक जिह्यांत वळवणे, अप्पर कडवासारखे प्रकल्प राबवणे, त्यातील समस्या दूर करणे इ. गोष्टीला प्राधान्य सिंचन विभागाने द्यायला हवे असे वाटते. कारण शेतीबरोबरच शहरी भागातही आजकाल दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची मागणी वाढतच आहे.
‘एल निनो’ची साशंकता म्हणून हे जर आपण केले नाही, तर ‘एल निनो’च्या वर्षामध्ये कदाचित दुष्काळ व त्यातून राज्याराज्यांत होणारी भांडणे आणि ‘ला निना’त येणारे महापूर व त्यातून होणारी जीवित वित्तहानी हे कालचक्र असेच सुरू राहील. पिण्याच्या पाण्यासाठी ऐन वेळेस धावाधाव उपयोगी ठरणार नाही. नियोजनातील गाफीलपणा हिंदुस्थानला नक्कीच लाजिरवाणं ठरेल. इतिहासातील ‘जलदूत रेल्वे’ने पिण्यासाठी पाणी आणण्यासारखा अनुभव जमेस असताना आणि या द्राविडी प्राणायामाची पुनरावृत्ती थांबवायची असेल तर जलसंपदा विभाग व प्रशासनाने या वर्षी पाण्याचा अपव्यय, अनावश्यक शेतीची आवर्तने यावर कटाक्ष ठेवून कमी करणे व भविष्यातील पेयजलासाठी सावधानता बाळगणे गरजेचे वाटते. यासाठी सिंचन कायद्याची सक्तपणे तसेच जल शिवाराची अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठीची अंमलबजावणी होणेही गरजेचे वाटते. यानिमित्ताने हेच आवाहन करावेसे वाटते.
(लेखक ज्येष्ठ हवामान तज्ञ आहेत)





























































