मुंबईने सलग दुसऱयांदा पटकावला ‘जागतिक वृक्षनगरी’ बहुमान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील वृक्षसंपदा जतन आणि संवर्धनाच्या मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांची दखल संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न आणि कृषी संघटना आणि आर्बर डे फाऊंडेशनने घेतली असून मुंबईचा ‘जागतिक वृक्षनगरी 2022’ देऊन गौरव केला आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र मुंबई महापालिकेला नुकतेच मिळाले. मुंबईने या आधी 2021 सालचा जागतिक वृक्षनगरी बहुमान पटकावला होता.

संयुक्त राष्ट्र संघाची विशेष संस्था असलेली अन्न आणि कृषी संघटना (फुड ऍण्ड ऍग्रिकल्चर ऑर्गनायजेशन) आणि आर्बर डे फाऊंडेशन यांनी जगभरात वृक्षसंवर्धन आणि वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणाऱया, त्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग राबवणाऱया शहरांचा गौरव करण्याची मोहीम 2019 पासून हाती घेतली.

वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन टिकून राहावे यासाठी जगभरात कोणकोणते प्रयत्न सुरू आहेत याचादेखील या मोहिमेत शोध घेऊन त्यावर सतत संशोधन केले जाते. या निकषांवर खरे उतरणाऱया शहरांची जागतिक वृक्षनगरी यादी घोषित करून त्यांना गौरविण्यात येते.

या निकषांची केली पूर्तता

हा बहुमान प्राप्त करताना मुंबईने पाच निकषांची पूर्तता केली आहे. झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करणे, नागरी वने आणि झाडांचे व्यवस्थापन नियंत्रित करण्यासाठी नियम निश्चित करणे, स्थानिक वृक्षसंपदेची अद्ययावत यादी किंवा मूल्यांकन राखणे, वृक्ष व्यवस्थापन योजनेसाठी साधनसामग्रीचे वाटप करणे आणि नागरिकांना शिक्षित करण्यासाठी वार्षिक वृक्ष उत्सव आयोजित करणे असे महत्त्वाचे पाच निकष आहेत.