विलक्षण योगायोग! जुळ्या बहिणींचं एकाच मांडवात लग्न, एकाच दिवशी दिला मुलांना जन्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुळ्या व्यक्तींचे अनेक किस्से आपण सगळ्यांनी ऐकले असतील. पण, वारंगल येथे एक विलक्षण योगायोग घडलेला दिसून आला आहे. येथील जुळ्या बहिणींनी एकाच मांडवात लग्न करून वर्षभराने एकाच दिवशी मुलांना जन्म दिला आहे. वारंगल येथील तिम्मपेटा गावात राहणाऱ्या बोंथु सरैय्या आणि कोमारम्मा या जोडप्याच्या ललिता आणि रामा यांच्यासोबत ही विलक्षण घटना घडली आहे.

ललिता आणि रामा या दोघींचा विवाह वर्षभरापूर्वी अनुक्रमे नागराजू आणि गोलन कुमार यांच्याशी झाला होता. या दोघींचा विवाह एकाच दिवशी एकाच मांडवात पार पडला होता. योगायोगाने 30 मार्च रोजी या दोघींनी नरसामापेट येथील रुग्णालयात मुलांना जन्म दिला आहे.

या दोघींनाही पाच दिवसांपूर्वी प्रसवकळा सुरू झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी आधी वेळ घेऊन सामान्य प्रसुतीसाठी प्रयत्न केले. मात्र, ललिताच्या गर्भात असणाऱ्या बाळाने सामान्य प्रसुती शक्य नसल्याचे संकेत दिले. योगायोगाने त्यावेळी प्रसुतीची वाट पाहणाऱ्या रामाच्या पोटातील बाळानेही तेच संकेत दिले. अखेर दोघींची सिझेरियन प्रसुती करण्यात आली. हा विलक्षण योगायोग चर्चेचा विषय झाला आहे. या दोघींनाही केसीआर किट देण्यात आले आहेत. यात बाळंतीणीला लागणाऱ्या आणि नवजात बाळाला उपयुक्त असणाऱ्या अनेक गोष्टी असतात.