
ताडदेव येथे राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्यावर 30 ते 40 जणांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने या हल्ल्यात त्या कार्यकर्त्याला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. दरम्यान, याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून ताडदेव पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.
ताडदेव येथील जनता नगरातल्या एम. पी. मिलमध्ये राहणारा पारस गोहिल (23) हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सोमवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या इमारतीखाली बसलेला असताना अचानक मोठा जमाव तेथे आला. त्यापैकी काहींनी पारसला शिवीगाळ करीत त्याला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच आदित्य नावाच्या आरोपीने त्याच्या हातातील तलवारीच्या मुठीने पारसच्या डोक्यावर पाठीमागील बाजूने मारले. हा प्रकार कळताच ताडदेव पोलिसांनी तत्काळ धाव घेतली, मात्र पोलिसांना बघून आरोपींनी तेथून पळ काढला, परंतु धुपत सुखाडिया (23), कृपाल सामंत (26) आणि श्रीकृष्ण सेवेन (25) या तिघांना पोलिसांनी जागेवरच पकडले. ताडदेव पोलीस आदित्य, रोहित मुळे व अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.



























































