प्रतापगडाच्या पायथ्याशी शेकडो झाडांची कत्तल; महसूल विभागाच्या पंचनाम्यानंतर घटना उजेडात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या कुंभरोशी गावात शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा केल्यानंतर ही घटना उजेडात आली आहे.

महाबळेश्वर हे पश्चिम घाटात येणारे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र असून, येथे वृक्षतोड करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तरीही वृक्षांची कत्तल होत असल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या मौजे कुंभरोशी येथील सर्व्हे नंबर 26/अ1 व सर्व्हे नंबर 25मध्ये शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यात अंजन, जांभूळ, आईन, पिसा, गिलोरा, करवंदे काटेरी, आंबोळी, केंजळ, टिपन, करडय़ा, हेळा, हिरडा, भोमा, भुरटी झाडे या प्रकारच्या 177 झांडाची कत्तल करण्यात आली आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील संवेदनशील पर्यावरणातील प्रतापगडाच्या पायथ्याशी धनदांडगे बेसुमार कत्तल करून पर्यावरणाला बाधा निर्माण करीत आहेत. अनधिकृत बांधकाम व वृक्षतोडीला लगाम उरला नाही. प्रतापगडाच्या पायथ्याशी असाच वृक्षतोडीचा प्रकार समोर आला आहे. महसूल व वन विभागाच्या संयुक्त पंचनाम्यामुळे ही बाब उजेडात आली आहे.

कुंभरोशी येथील गट क्रमांक 25 व 26/1 हे पूर्णतः वनसदृश क्षेत्रात येतात. त्यामुळे योग्य मोजमाप, झाडांची नावे, तसेच इतर मोजमाप करण्यासाठी योग्य कार्यवाही करणे योग्य राहील, असे महाबळेश्वरच्या तहसीलदारांनी वाईच्या प्रांताधिकाऱयांना पत्राद्वारे कळविले आहे. त्यानंतर झाडांच्या कत्तलीचा हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वनसदृश क्षेत्रात झाडांची कत्तल करणाऱयांवर वन विभाग काय कारवाई करणार, याकडे महाबळेश्वरकरांसह पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.