
आठ हजारांहून अधिक जिंगल्स, चारशे नाटके, दीडशे चित्रपट, पाचशे मालिकांना शीर्षक गीतं देणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचे सप्तसूर आता ऑस्ट्रेलियात गुंजणार आहेत. ऑस्ट्रेलियातील मराठी रसिकांनी अशोक पत्की यांच्या ‘सप्तसूर माझे’ या कार्यक्रमाचे येत्या 9 एप्रिल ते 3 मेदरम्यान आयोजन केले आहे. सिडनी, पर्थ, ऍडलेड, मेलबर्न येथे सात कार्यक्रम होणार आहेत. तसेच पत्की यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा होणार आहे.
नोकरी-व्यवसायानिमित्त ऑस्ट्रेलियात स्थिरावलेल्या मराठी माणसांची संख्या प्रचंड आहे. प्रशांत तुपे हे त्यापैकीच एक. ‘नटराज प्रोडक्शन’च्या वतीने ते ऑस्ट्रेलियात विविध शहरांत हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम करतात. त्यांनी अशोक पत्की यांचा ‘सप्तसूर माझे’ हा कार्यक्रम ऑस्ट्रेलियातील विविध शहरांत आयोजित केला आहे. ‘सप्तसूर माझे’ हे पत्की यांच्या पुस्तकाचे नाव आहे. रसिकांनी फक्त फर्माईश करायची आणि पत्कींनी ती सादर करायची, असा काहीसा गीत, संगीत आविष्कार ऑस्ट्रेलियातील मराठी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

























































