राज्यात पुढील चार दिवस पावसाचे ; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गडगडाटासह पाऊस पडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यात दिवसा मोठय़ा प्रमाणात उकाडा जाणवत असतानाच रात्री कमालीचा गारठा वाढला असताना राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवसांत गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडला.

राज्यात गेल्या काही दिवसांत तापमानात कमालीची वाढ झाली असून त्यामुळे उन्हाचा कडाका वाढला आहे. मात्र, येत्या चार दिवसांत राज्यात 9 एप्रिलपर्यंत मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह पाऊस आणि गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शुक्रवार, 7 एप्रिलला कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह सोसाटय़ाचा वाऱयासह पाऊस आणि गारा पडण्याचा अंदाज आहे. शनिवार, 8 आणि रविवार, 9 एप्रिलला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाटांसह तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

पाऱयाने चाळीशी ओलांडली

महाराष्ट्र तापला

एप्रिल महिन्यातच महाराष्ट्र चांगलाच तापला असून पाऱयाने चाळीशी ओलांडली आहे. विदर्भातील चंद्रपूर, अकोला आणि वर्ध्याचा पारा 40.4 अंशांवर पोहोचला आहे. पुण्यातही सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात दुपारी उन्हाचे चटके जाणवत असून दुपारी पुणेकरांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

फेब्रुकारी महिन्यानंतर एप्रिल महिन्यात तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. मागील काही वर्षांत पुण्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कायम थंड वातावरण अशी ओळख असलेल्या पुण्याची आता हॉट सिटी म्हणून ओळख निर्माण होत आहे. पुणे जिह्यात पावसाची शक्यता सांगितली जात होती. मात्र उन्हाचा पारा वाढतच आहे. जिह्यातील शिरूरमध्ये 40.2 सेल्सिअस, कोरेगाव पार्क 39.5, लवळे, वडगाव शेरी 39, चिंचवड 38, मगरपट्टा 37.9, खेड 37.7, इंदापूर 37.3, दौंड 37.2, बालेवाडी 37 , शिवाजीनगर 36.8, तळेगाव 36.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

चंद्रपूर, अकोला, वर्धा 40 अंशांवर

पुण्यातही सर्वाधिक तापमानाची नोंद

मुंबईकरांसाठी पुढचा आठवडा महत्वाचा

एप्रिल महिन्यात मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. या काळात पारा 40 अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. 10 एप्रिलपासून तापमानाचा पारा वाढणार आहे.