
वर्ष 2023-24 च्या दहावी- बारावीच्या परीक्षेपासून सीबीएसई बोर्ड परीक्षा मूल्यांकन पद्धतीत बदल करणार असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुचविलेल्या शिफारसींच्या आधारे नवीन मूल्यांकन पद्धती विकसित करण्यात आली आहे. यात क्षमतेवर आधारित प्रश्न विचारण्यात येतील. प्रश्नपत्रिकेतील लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचे महत्त्वही कमी केले जाणार असून सुमारे 50 टक्के प्रश्नपत्रिका ही बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारसींनुसार मूल्यांकन पद्धती ठरविण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे. हा बदल शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील परीक्षांपर्यंत मर्यादित असू शकतो. त्यानंतर 2024 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यास सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे. येत्या शैक्षणिक वर्षातील परीक्षेत क्षमतेवर आधारित प्रश्न किंवा वास्तविक जीवनातील संकल्पनांचा वापर याचे मूल्यांकन करणारे प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांची वैचारिक क्षमता वाढविण्यावर भर
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 नुसार 21 व्या शतकातील आव्हानांचा सामना कसा करावा याचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे अभ्यासातील घोकंपट्टी कमी करून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि वैचारिक क्षमता वाढविण्यावर भर देण्यासाठी परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर आधारित मूल्यांकन लागू करण्यात येणार असल्याचे सीबीएसई बोर्डाचे संचालक जोसेफ इमॅन्युअल यांनी सांगितले.
नववी आणि अकरावीच्या परीक्षेतही बदल
येत्या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीबरोबरच सीबीएसई बोर्डाने नववी आणि अकरावीच्या परीक्षेतही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नववी आणि अकरावीच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर आधारित प्रश्न विचारण्यात येणार असून लघू आणि दीर्घ प्रकारच्या प्रश्नांचे महत्त्व कमी करण्यात येणार आहे. लघु आणि दीर्घ उत्तरांच्या एकत्रित प्रश्नांना 50 ऐवजी 40 टक्के गुण असतील, असे सीबीएसई बोर्डाने म्हटले आहे.
असे असेल प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
z दहावीमध्ये एकूण प्रश्नांपैकी 50 टक्के प्रश्न हे बहुपर्यायी प्रश्न असतीत. एखाद्या घटनेवर किंवा इतर कोणत्याही समस्येवर आधारित प्रश्न विचारले जातील. मागील परीक्षेत अशा प्रश्नांचे वेटेज हे 40 टक्के होते.
z वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भाग केवळ 20 टक्केच असेल. बहुपर्यायी स्वरूपाचे हे प्रश्न असतील. तसेच लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्न यंदा 30 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. गेल्या वर्षी या प्रश्नांचे वेटेज 40 टक्के होते.
z बारावीमध्ये 40 टक्के प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. यातही एकात्मिक स्वरूपाचे आणि केस स्टडीवर आधारित प्रश्न विचारले जातील. अशा प्रश्नांचे गेल्या सत्रातील वेटेज 30 टक्के होते.
z वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत असेल, तर लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रकारच्या प्रश्नांचे मागील वर्षाच्या 50 टक्के प्रमाण यंदा 40 टक्क्यांवर आणले आहे.





























































