
दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणी एका विद्यार्थ्याला गुन्हे शाखेच्या एसआयटीने अटक केली. अरमान खत्री असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
दर्शन हा मूळचा अहमदाबादचा रहिवाशी होता. तो पवईच्या आयआयटीमधून केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. गेल्या महिन्यात दर्शनने हॉस्टेलच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती समजताच पवई पोलीस घटनास्थळी आले. पवई पोलिसांनी दर्शनला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी दर्शनला मृत घोषित केले. पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. दर्शनची आत्महत्या नसून त्याची हत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला.
या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे शाखेची एक एसआयटी तयार केली. एसआयटीने तपास सुरू केला. तपासा दरम्यान एसआयटीच्या पथकाने काही विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून घेतले. तपास करत असताना एसआयटीच्या पथकाला एक सुसाईड नोट मिळून आली. ती सुसाईड नोट दर्शनने लिहल्याचे उघड झाले. त्यावरून एसआयटीने गुन्हा दाखल केला. दर्शन हा रूम नंबर 802 तर अरमान हा रूम नंबर 806मध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वी दर्शन आणि अरमानचा धार्मिक विषयावरून वाद झाला होता. त्यावरून त्यांच्यात बाचाबाचीदेखील झाली होती. अरमानने कटर दाखवल्याने दर्शन हा घाबरला होता. तेव्हा दर्शनने अरमानची माफी मागून विषय मिटवला होता. पण अरमान आपल्याला मारहाण करेन ही भीती दर्शनला वाटत होती. गुन्हे शाखेच्या एसआयटीने अरमानची चौकशी केली. चौकशीअंती एसआयटीने अरमानला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.






















































