शिर्डीतील दर्शनरांगेच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळणार कधी? नविन दर्शन कॉम्प्लेक्स अडकले लालफितीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साईबाबा संस्थानचा महत्वाकांक्षी असलेल्या दुमजली वातानुकूलित दर्शनरांग कॉम्प्लेक्सचे काम तीन महिन्यांपूर्वी पूर्ण होऊनही उदघाटन सोहळा लांबल्याने भक्तांच्या देणगीतून उभारली गेलेली सुविधा भक्तांना मिळत नाही. वाढत्या तापमानात भक्तांना थंड हवेशीर दर्शन मिळावे यासाठी 109 कोटी रूपये खर्चून बांधलेले अत्याधुनिक वातानुकूलित दर्शनरांग काॅम्लेक्स मात्र आजही उदघाटना विना पडून असून साईभक्त मात्र भर उन्हातच कुटुंबासह दर्शनाला गर्दी करत आहेत.

देशातील दुसर तर राज्यातील सर्वधिक श्रीमंत समजल्या जाणाऱ्या शिर्डीत दर्शनासाठी दररोज हजारो तर उत्सव व सुट्टीच्या काळात लाखो भाविक हजेरी लावतात.अनेकदा गर्दीमुळे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी तासनतास दर्शनरांगेत सुद्धा उभं राहण्याची वेळ भक्तांवर येत असते. गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत असून पुढील महिन्यात यात अधिक भर पडेल. साईभक्तांच्या देणगीतून दुमजली वातानुकूलित दर्शनरांगेमुळे साईभक्तांना मोठा दिलासा मिळेल अशीच अपेक्षा होती मात्र पालकमंत्री विखे पाटील यांनी मार्च मध्ये लोकार्पण होण्याची घोषणा करूनही नेत्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे उदघाटन सोहळा लांबला असून आज वाढत्या तापमानाचा सामना करत भक्तांना दर्शन घेण्याची वेळ आली आहे.

महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणी खासदार सुजय विखे यांनी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदिंची भेट घेऊन दर्शनरांग कॉम्प्लेक्स, शैक्षणिक संकुल लोकार्पण करण्याचे निमंत्रण दिले होते व साधारण मार्च महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार पडेल अशी घोषणा सुद्धा केली होती. मात्र अद्यापही उदघाटन सोहळा न झाल्याने भक्तांची गैरसोय होतेय हे नक्की. वाढत्या तापमानात भक्तांना थंड हवेशीर वातावरणात दर्शन मिळेल ही अपेक्षा होती मात्र आजही भक्तांना भर उन्हातच दर्शनरांगेत जाऊन दर्शन घेण्याची वेळ आली आहे.

आज जर शिर्डीत भक्त आला तर लाॅकर, चप्पल स्टॅण्ड ,लाडू कांऊटर, डोनेशन कांऊटर, ऊदी स्टाॅल, टाॅयलेट अशा अनेक गोष्टींची शोधाशोध करावी लागते. त्यात वाढलेले तापमान यामुळे साईभक्तांची मोठी गैरसोय होत असून जर काम पूर्ण झाले असेल तर नवीन दर्शनरांग सुरू करण्याची मागणी साईभक्तांनी केली.

अत्याधुनिक दर्शनरांग ही संपूर्ण वातानुकूलीत असून साईभक्‍तांच्या सुरक्षेची विशेष काळजी यात घेण्यात आली आहे. मात्र काम पूर्ण होऊनही ती सुरू न झाल्याने ती सुरू करून साईभक्तांना दिलासा देण्याची मागणी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

दर्शनरांग लवकर सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा माजी विश्वस्तांनी दिला असून सरकारने दर्शनरांग सुरू करावी व सोहळा नंतर घ्यावा अशी मागणी केली आहे. साईबाबा संस्थानवर न्यायालय नियुक्त समिती असताना ती कोणाच्या तालावर नाचते हा प्रश्न असून 15 दिवसात निर्णय न झाल्यास वेगळा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा दिला आहे.
डॉ. एकनाथ गोंदकर माजी विश्वस्त, साईबाबा संस्थान, शिर्डी