
>> सुहास मळेकर
धंद्याचं गणित कुठेतरी वाचलं होतं. तुम्ही तो चालू केलात तर एक हजार दिवस त्यासाठी चिवटपणे झुंजावं लागतं तेव्हा तो छान चालू लागतो. त्याला कारण असतं त्यात झोकून दिलं की त्यातले खाचखळगे तुम्हाला कळायला लागलेले असतात. तुम्ही आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आलात तरी या एक हजार दिवसांत मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम झालेले असता. एकदा धंदा पत्करलात की, हे झोकून देणं महत्त्वाचं.
साखर वाढलीय असा अंदाज आला की सकाळी चालायला जातो. तेव्हा साधारण दोन किलोमीटरवर कंपन्यांना चिकटून सगळे खाण्यापिण्याचे स्टॉल लागतात. चालून झाल्यावर परत मागे फिरण्यापूर्वी कधीतरी सुट्टीच्या दिवशी वेळ असतो म्हणून चहा पिण्यासाठी थांबतो तसाच एका रविवारी त्या परिसरात थांबलो.
सुरुवातीला टपरीवजा दुकान थाटलेलं एक जोडपं दिसलं म्हणून स्टूल ओढून बसायला घेत मी त्यांना विचारलं…
‘बिनसाखरेचा चहा मिळेल ना हो?’
‘कस्टमर नाही म्हणून बनवत नाही ओ!’
प्रश्न दोन-तीन मिनिटांचाच पण मालकानं उडवून लावलं.
पुढे जाऊन दुसऱयाला बिनसाखरेचा चहा विचारला,
‘आम्ही ठेवत नाही! तुम्ही परवा पण विचारलेलं ना साहेब?’
मलाच लाज वाटून कसंसच झालं.
पुढे गेल्यावर तिसऱयाला विचारलं, ‘बिनसाखरेचा चहा मिळेल का?’
‘दो मिनिट साहब, अभी बनाके देता हूं…बैठो’
त्याने स्टूल दिला बसायला.
आणि पाच मिनिटे घेऊन बिनसाखरेचा मस्त चहा बनवून दिला. एकदा धंदा पत्करलात की त्यासाठी तुमचं समर्पण हवं.
आज खूप दिवसांनी तिकडे गेलो तर तो पहिला नाही म्हणणाऱयाचा धंदा नव्हता तिथे. त्याचा मोडकळीला आलेला बाकडा त्याच झाडाखाली साखळीने बांधलेला दिसला.

































































