
राज्यात वाघांची संख्या एकीकडे वाढत आहे तर दुसरीकडे वाघ-बिबटय़ांकडून गावकऱ्यांवरील हल्लेही वाढत आहेत. जंगलामध्ये माणसांची घुसखोरी वाढत असल्याने नैसर्गिक भक्ष्य कमी होत असल्याने वाघ-बिबटे मानवी वसाहतींमध्ये शिरत आहेत. त्यामुळे आता ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील दोन गावांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची (कृत्रिम बुद्धिमत्ता) मदत घेऊन वाघांच्या आगमनाचा गावकऱ्यांना अॅलर्ट मिळणार आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही वाघांच्या वाढत्या हल्ल्यांचे पडसाद उमटले होते. अगदी सातारा सांगलीपासून नागपूर विदर्भातील लोकप्रतिनिधींनी वाघ-बिबटय़ांच्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. सांगली जिह्यातील वाळवा व शिराळा तालुक्यात गेल्या काही दिवसांत 500पेक्षा अधिक गाई-गुरांना बिबटय़ाने ठार केल्याची आकडेवारी आहे.
राज्यात सध्या मानव व वाघांमध्ये संघर्ष वाढत आहे. दुसरीकडे वाघांची संख्याही वाढत आहे. अलिकडच्या आकडेवारीनुसार राज्यातील वाघांची संख्या चारशेच्या आसपास झाली आहे. वन विभागाच्या माहितीनुसार ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुमारे 86 वाघ आहेत. चंद्रपूरमध्ये 117 तर गडचिरोलीत 27 वाघ आहेत. राज्यात खास करून चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वाघांच्या वाढत्या संघर्षावर चंद्रपूरच्या मुख्य वन संरक्षकांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती नेमण्यात आली होती. त्यामध्ये गावकऱयांचे वनांवरील अवलंबन कमी करण्यास सुचवले आहे. त्याशिवाय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजने अंतर्गत गावकऱयांना घरगुती गॅस पुरवणे, सौर ऊर्जा उपकरणे, सौर ऊर्जा कुंपण, शौचालय बांधकाम करण्याच्या शिफारशी केल्या आहेत. या योजने अंतर्गत आतापर्यंत 376 कोटी 78 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
जंगलाच्या बाहेर अदृश्य कुंपण
वाघ-बिबटय़ांचे वाढते हल्ले व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर वन खात्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत वाघ-बिबटय़ांच्या आगमानाचा अॅलर्ट देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानचा आधार घेण्याची योजना आखली होती. त्यानुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पाबाहेरील दोन गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर आर्टिफिशअल इंटेलिजन्सचा आधार घेत वाघांच्या आगमानाची सूचना देणारी यंत्रणा लावण्यात येणार आहे, अशी माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिली. जंगलाबाहेर अदृश्य कुंपण उभारण्यात येणार आहे. त्यात थर्मल लहरींच्या आधारे वाघ-बिबटय़ांच्या आगमनाचा इशारा मिळणार आहे. जंगलातून एखादा वाघ गाव-शहराकडे निघाला तर थर्मल लहरींद्वारे अॅलर्ट मिळेल, अशी यंत्रणा राबवण्यात येणार आहे.
मागील सहा वर्षांची आकडेवारी
वाघांच्या हल्ल्यातील बळींची संख्या 232
बिबटय़ांच्या हल्ल्यातील बळींची संख्या 103



























































