साखर उत्पादनात कोल्हापूर, सांगलीची आघाडी; गळीत हंगामाची सांगता; 22 लाख टन साखरेचे कमी उत्पन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सहकारी व खासगी अशा 210 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नुकताच संपला. सोलापुरात सुरू असलेल्या एका कारखान्याचाही 16 एप्रिलला अखेरचा भोंगा वाजल्यानंतर राज्यातील गळीत हंगामाची अधिकृत सांगता झाली. यंदाच्या गळीत हंगामात 1 हजार 54 लाख टन उसाचे गाळप होऊन 105 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या गळीत हंगामाच्या तुलनेत तब्बल 22 लाख टन साखरेचे उत्पादन कमी झाले. 11.45 टक्के इतक्या मोठय़ा उताऱयाने 27 लाख टन साखर उत्पादन करत कोल्हापूर-सांगली जिह्याने यंदाही अव्वलस्थान राखले. राज्याचा सरासरी साखर उतारा 9.98 टक्के राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते.

एक टक्का साखरेचा उतारा कमी पडणे म्हणजे दहा किलो साखर उत्पादन घटण्यासारखे आहे. त्यातून साखरेच्या दराप्रमाणे प्रतिटन 310 रुपयांचा तोटा होतो. मागील दहा वर्षांत राज्यात सरासरी 11 टक्के आणि त्याहून अधिक साखर उतारा मिळाला आहे. यंदा प्रथमच बारा वर्षांत अकरा टक्क्यांपेक्षा खाली उतारा आला आहे. मागील वर्षी सरासरी 11.30 टक्के उतारा होता. सन 2011-12 साली राज्यात 7.56 लाख हेक्टर क्षेत्र उसाखाली होते. सन 2020-2021 मध्ये 11.42 लाख हेक्टर क्षेत्र होते. गत हंगामाच्या तुलनेत यंदा उसाखालील क्षेत्र 3.20 लाख हेक्टरने वाढले.

यंदाच्या गाळप हंगामात 1 हजार 54 लाख टन उसाचे गाळप झाले. त्यातून 105 लाख 27 हजार टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या हंगामात 197 साखर कारखान्यांचे महाराष्ट्रात विक्रमी 137.28 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा 210 साखर कारखान्यांकडून 122 ते 125 लाख टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज होता. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी 105 लाख टन इतकीच साखर उत्पादित झाली. साखर कारखान्यांकडून एफआरपीच्या 17 हजार कोटींपैकी 88 टक्के रक्कम ऊसउत्पादक शेतकऱयांना दिल्याचे दिसते.

लांबलेल्या पावसाचा साखर उत्पादनावर परिणाम

लांबलेल्या पावसामुळे यंदा ऊस उत्पादनासह थेट साखर उत्पादनावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. सन 2021-22च्या बंपर हंगामानंतर 2022-23च्या ऊसगाळप हंगामातही साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज होता. राज्यातील 210 साखर कारखान्यांनी एक हजार 343 लाख टन उसाचे गाळप करून किमान 138 लाख टन साखरेचे उत्पादन करणे अपेक्षित होते. मात्र, प्रदीर्घ पावसामुळे प्रतिहेक्टर ऊस उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. राज्यातील अंतर्गत साखरेची गरज 75 लाख टन, तर निर्यात 20 लाख टन झाली आहे. मागील वर्षी 40 लाख टन साखर शिल्लक होती.

 विभाग कारखाने          गाळप    साखर उत्पादन   उतारा

  (लाख टन)          (लाख टन)    (टक्के)

कोल्हापूर      36     231.92   26.54      11.45

पुणे          32     226.2    22.90      10.13

सोलापूर      50     231.78   20.78      8.96

नगर         28     136.25   13.16      9.66

छत्रपती संभाजीनगर    26       109.57     10.12    9.24

नांदेड        30     106.58   10.68      10.2

अमरावती     04     7.80     0.75       9.63

नागपूर       04     4.83     0.34       7.20

एकूण        210    1054.75  105.27     9.98