
>>डॉ. ज्योती धर्माधिकारी
सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि पारदर्शक सरकार या तिन्ही गोष्टींमुळे स्योमारा कॅस्ट्रो यांचे नाव ‘फोर्ब्स’च्या प्रभावशाली स्त्रियांच्या यादीमध्ये नोंदवले गेले. होंडुरास हा छोटासा मध्य-अमेरिकेतील देश आज प्रगतीपथावर निघाला आहे. याचे सर्व श्रेय राष्ट्राध्यक्षांच्या ध्येयधोरणांना जाते. या धडाडीच्या स्त्राrने एका छोटय़ा देशाला वैश्विक महत्त्वपूर्ण देश बनवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हों डुरास हा मध्य अमेरिकेतील एक अगदी छोटासा देश. या देशाचे क्षेत्रफळ आपल्या ओडिशा राज्यापेक्षा किंचितसे कमी आणि छत्तीसगढ राज्यापेक्षा थोडे जास्त आहे. माया लोकांचे परंपरागत वास्तव्य असलेल्या या देशावर मध्ययुगामध्ये स्पॅनिश साम्राज्याने आपली वसाहत निर्माण केली. आज देशाची मातृभाषा स्पॅनिश आहे. लोकसंख्या म्हणाल तर जेमतेम 82 लाख इतकी असेल. या छोटय़ाशा राज्याचा मानव विकास निर्देशांक मात्र हिंदुस्थानी निर्देशांकापेक्षा जास्त आहे. लॅटिन अमेरिकेतील सर्वात वेगाने आर्थिकदृष्टय़ा प्रगती करणाऱया देशांपैकी एक अशी या देशाची ओळख निर्माण झाली आहे. त्याचे कारण नुकतीच गेल्या जानेवारी 2022 पासून या देशाची सूत्रे स्योमारा कॅस्ट्रो सिरमियाँटो या महिलेच्या हातात आली. त्या देशाच्या 56व्या आणि पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. स्योमारा कॅस्ट्रो सिरमियाँटो यांचा जन्म 30 सप्टेंबर 1959 रोजी झाला. पाच भावंडांपैकी त्या दुसऱया अपत्य होय. त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन या विषयामध्ये तेगुसिल्पा (राजधानीचे शहर) येथून पदवी मिळवली. 2006 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर स्योमारा या देशाच्या पहिल्या महिला नागरिक होत्या. मॅन्युअल झेलय्या यांच्याशी त्यांचा विवाह 1976 मध्ये झाला. 2006 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लिबरल पार्टी या पक्षाच्या वतीने राष्ट्राध्यक्ष म्हणून ते निवडून आले. अर्थात, त्यांचा हा कालखंड फार सुखाचा नव्हता. तीनच वर्षांमध्ये त्यांना पदच्युत व्हावे लागले. पतीवर अविश्वास ठरावाच्या विरोधात स्योमारा यांनी एक आघाडी उघडली. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. झेलय्या यांचे पद गेले ते गेलेच, पण पॉप्युलर रेझिस्टन्स अर्थात प्रसिद्ध विरोधी मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणाऱया स्योमारा यांची राजकीय कारकीर्द तिथून घडली. त्यातूनच लिबर्टी आणि रिफाऊंडेशन पक्षाच्या वतीने 2013 च्या निवडणुकीसाठी त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी नॅशनल पार्टीचे जॉन
ऑरलेंडो हेरर्नानडेझ यांच्याबरोबर त्या निवडणूक हरल्या. तरीही विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची भूमिका अतिशय वादळी ठरली. याच काळात त्यांनी घटनादुरुस्तीसाठी मागणी केली. 2017च्या निवडणुकीमध्ये त्या निवडूनही आल्या, परंतु पुरेशा मताधिक्याच्या अभावी त्यांना नवोपाम आणि एकत्रीकरण पक्ष यांच्याशी हातमिळवणी करावी लागली.
सॅल्वाडोर नासरल्ला या दोन नंबरच्या उमेदवाराला त्यांनी राष्ट्राध्यक्ष उमेदवारी देऊ केली. दुर्दैवाने मतमोजणीमध्ये काहीतरी गडबड झाली आणि निवडून येता येता राष्ट्राध्यक्षपद पुन्हा जॉन ऑरलेंडो हेरर्नानडेझ यांच्याकडे गेले. 2021 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुन्हा त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आणि यावेळी त्या मताधिक्याने निवडून आल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी सॅल्वाडोर नासरल्ला यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. स्योमारा यांना स्पष्ट बहुमत मिळाले आणि 30 नोव्हेंबर रोजी त्यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड पक्की झाली. 27 जानेवारी 2022 रोजी त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. 64 वर्षीय राष्ट्राध्यक्ष स्योमारा कॅस्ट्रो या पहिल्यापासूनच झंझावाती भूमिकेसाठी प्रसिद्ध होत्या. भ्रष्टाचारविरोधी भूमिकेसाठी त्या नेहमीच चर्चेत राहिल्या. त्यांची बहुतांश धोरणे ही स्त्राrवादी, स्त्रियांना संरक्षण आणि आत्मभान देणारी होती. होंडुरास देशामध्ये गर्भपाताला कठोरपणे कायद्याने बंदी होती. साहजिकच कुमारी माता, विधवा माता आणि नकोशी झालेली मुले यामुळे देशातील महिला त्रस्त होत्या. स्त्रियांना गर्भपाताचा कायदेशीर अधिकार मिळावा यासाठी त्या सुरुवातीपासून लढत होत्या. जवळ जवळ एक तपापासून होंडुरास देश भ्रष्टाचार आणि घोटाळय़ांमुळे त्रस्त होता. एक तपापासून देशाची आर्थिक प्रगती थांबलेली होती. आधीच्या तीनही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्योमारा यांनी भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक सरकार देण्याची शपथ घेतली होती. त्यासाठी संपूर्ण राज्यघटना बदलायची वेळ आली आणि त्यांनी ती बदलली. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड करायला त्या मागेपुढे बघत नाहीत.
गेल्या अनेक वर्षांपासून तैवानसोबत असलेले त्यांचे संबंध नुकतेच म्हणजे 26 मार्च 2023 मध्ये संपुष्टात आले. तैवान या स्वतंत्र देशाला होंडुरासची मान्यता होती. मात्र आर्थिक विकासाची पावले ओळखून नुकतीच स्योमारा कॅस्ट्रो यांनी चीन या सार्वभौम राज्यासोबत हातमिळवणी केली. देशासाठी सर्व प्रकारच्या तडजोडी करणाऱया स्योमारा कॅस्ट्रो या देशातील जनतेच्या गळय़ातल्या ताईत आहेत. राष्ट्राध्यक्षा म्हणून त्यांना पहिल्यांदाच संधी मिळालेली असली तरी जनतेने त्यांच्यावर कायम विश्वास दाखवलेला आहे. व्यावसायिक लॉबीचा विरोध पत्करून ग्रामीण स्थानिक कुटुंबांवर होणारा अन्याय थांबवण्यामध्ये त्यांनी भूमिका घेतली. खुल्या खाणींमध्ये खाणकाम करण्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. उच्च पर्यावरणीय मूल्य जपण्यासाठी त्यांनी अशा प्रकारच्या खाणकामाला बंदी घातली. विशेष आर्थिक क्षेत्राला त्यांनी विरोध केला. आर्थिक समानता आणण्यासाठी हे त्यांचे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरले. गरीबांना वीज बिलामध्ये पूर्ण सवलत, मोफत इंधन पुरवठा अशा काही कल्याणकारी योजना त्यांनी देशात राबवल्या. नद्या आणि जलक्षेत्राच्या खोऱयामध्ये तसेच राष्ट्रीय उद्यानांच्या क्षेत्रामध्ये घुसखोरी करून इंधन निर्मिती करणाऱया सर्व कंपन्यांचे अनुदान त्यांनी बंद केले. त्यामुळे या क्षेत्राला संरक्षण मिळाले आणि पर्यावरणाचा होणारा ऱहास टळला.
सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि पारदर्शक सरकार या तिन्ही गोष्टींमुळे स्योमारा कॅस्ट्रो यांचे नाव ‘फोर्ब्स’च्या प्रभावशाली स्त्रियांच्या यादीमध्ये नोंदवले गेले. होंडुरास हा छोटासा मध्य-अमेरिकेतील देश आज प्रगतीपथावर निघाला आहे. याचे सर्व श्रेय राष्ट्राध्यक्षांच्या ध्येयधोरणांना जाते. या धडाडीच्या स्त्राrने एका छोटय़ा देशाला वैश्विक महत्त्वपूर्ण देश बनवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत)





























































