
कोकणातील नागरिकांच्या प्रखर विरोधामुळे नाणारमधून हद्दपार झालेला रिफायनरी प्रकल्प दडपशाहीच्या जोरावर राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरात पुढे रेटण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिकांकडून त्यास प्रचंड विरोध होत असून रिफायनरीविरोधात कोकणात पुन्हा एकदा जोरदार आंदोलन पेटले आहे. अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे आहेत? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यातच मुख्यमंत्री शिंदे अचानक तीन दिवसांची रजा घेऊन आपल्या गावी निघून गेले आहेत. यामुळे राजकीय तर्कवितर्कांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाच्या जोरदार हालचाली सुरू असल्याने मुख्यमंत्री शिंदे हे अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते नाराज होऊन तडकाफडकी तीन दिवस साताऱ्याला गावी निघून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या गावची जत्रा आहे. ते गावच्या जत्रेला गेले आहेत. ते नाराज नाहीत, अशी सारवासारव केली.
24 ते 26 एप्रिलपर्यंत रजेवर
मुख्यमंत्री शिंदे तीन दिवसांसाठी गावी जाणार असा कोणताही कार्यक्रम ठरला नव्हता, परंतु जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन दिवस गावी जात असल्याचा संदेश पाठवला. मुख्यमंत्री 24 ते 26 एप्रिल रजेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
चर्चा काय?
सत्तासंघर्षाचा सर्वेच्च न्यायालयाचा निकाल केव्हाही येऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे गावच्या देवीला साकडे घालण्यासाठी गेलेत.
मुख्यमंत्री बदलाच्या भाजपच्या पडद्यामागच्या राजकारणामुळे शिंदे नाराज आहेत. भाजपला हे उघडपणे सांगता येत नाही. त्यामुळे ते नाराज होऊन गावी निघून गेल्याची चर्चा आहे.
































































