विनय कारगावकर यांना 48 तासांसाठी महासंचालकपदी बढती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवृत्तीसाठी अवघे 48 तास शिल्लक असताना शासनाने अपर पोलीस महासंचालक विनय कारगावकर यांना पोलीस महासंचालकपदी बढती दिली. इतके दिवस महासंचालकपदाच्या काही जागा शिल्लक असताना वेळीच अधिकाऱयांना बढत्या न दिल्याने कारगावकर यांना दोन दिवसांसाठी महासंचालकपद भूषविता येणार आहे. दरम्यान, कारगावकर यांच्याबरोबर संजयकुमार वर्मा यांनाही महासंचालकपदी बढती देण्यात आली.

राज्याच्या नियोजन व समन्वय विभागाचे अपर महासंचालक संजयकुमार वर्मा हे आता राज्याच्या न्यायिक व तांत्रिक विभागाचे महासंचालक म्हणून कामकाज पाहतील. तर राज्याच्या नागरी हक्क संरक्षण विभागाचे अपर महासंचालक विनय कारगावकर यांची महासंचालकपदी बढती करून त्यांच्याकडे त्याच विभागाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. कारगावकर हे केवळ एक दिवसच या विभागाचे कामकाज पाहतील. ते रविवारी सेवानिवृत्त होणार आहेत. जर शासनाने वेळीच वरिष्ठ अधिकाऱयांना बढत्या दिल्या असत्या तर कारगावकर यांना काही दिवस तरी महासंचालक म्हणून कामकाज करण्याची संधी मिळाली असती. पण दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. शासनाच्या भोंगळ कारभाराचा त्यांना फटका बसला अशी चर्चा पोलीस दलात सुरू आहे.