
हुमेरा काझी हिने महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपल्या दर्जेदार खेळातून मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. नुकतेच तिने एका मुलाखतीत आपल्या विजयाचे श्रेय आपल्या संघाला दिले असून संघाने निर्माण केलेल्या वातावरणामुळे ते शक्य झाल्याचे तिने सांगितले.
हुमेरा काझीने सांगितले की, संघाचे सुरुवातीपासूनच ध्येय निश्चित होते. “आम्ही सुरुवातीला पाच सामने जिंकलो. आम्हाला जिंकण्यासाठी काय करायचे होते हे चांगले ठावूक होते. त्यानंतर जेव्हा आमचा दोन सामन्यांमध्ये पराभव झाला, त्यावेळी त्यात नेमके आमचे काय चुकले ते आम्हाला कळले आणि चुका सुधारून आम्ही पुन्हा जोमाने खेळलो आणि मुंबई इंडियन्ससाठी महिला प्रिमीयर लीगची ट्रॉफी आम्ही पटकावली.
यावेळी हुमेरा म्हणाली की, कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघाचा हुरूप वाढला. हरमनप्रीतविषयी अनेकांकडून ऐकले होते की, ती खूप कडक आहे आणि फार कमी बोलते. पण जेव्हा ती संघात सहभागी झाली त्यावेळी अगदी उलट होते. हरमनप्रीत खूप प्रेमळ आणि मजेदार व्यक्तीमत्व आहे आणि तिच्याकडून फार सकारात्मक भावना येतात. सराव सत्रादरम्यान तिच्याकडून बऱ्य़ाच गोष्टी शिकता आल्या. त्यामुळे तिच्याविषयीचा आदर वाढल्याचे काझीने सांगितले. मुंबई इंडियन्सने त्यांचे पहिले पाच सामने जिंकल्याच्या सुरुवातीनंतर, त्यांना दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. पण आम्ही निराश झालो नाही उलट आणखी जोमाने पुढचे सलग तीन सामने जिंकून विजेतेपद पटकावले.
“मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करणारी स्थानिक खेळाडू म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजते. माझ्यासाठी सकारात्मक गोष्ट म्हणजे तेथील विकेट कशी आहे याबद्दल मला माहीत होते. टूर्नामेंटच्या शेवटी विकेट्स कसे कमी होतील याबद्दल मी बोलले. मुंबई इंडियन्सचा एक भाग असणं हे माझ्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे तिने सांगितले.



























































