
शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरला, आता ‘मातोश्री’ हे नावदेखील मिंध्यांनी चोरले आहे, कदाचित उद्या ‘ठाकरे’ आडनावही लावतील, असा जोरदार हल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज केला. हिंमत असेल तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी वरळीतून निवडणूक लढवावी नाहीतर मी ठाण्यातून लढवतो, असे आव्हानही त्यांनी पुन्हा एकदा दिले.
आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राज्यातील विविध मुद्दय़ांवर भाष्य करतानाच एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. कर्नाटकातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे हे आज बंगळुरू दौऱयावर आहेत. ‘50 खोकेवाले घटनाबाह्य मुख्यमंत्री 40 टक्केवाल्यांचा प्रचार करायला गेले. खरंतर तिथे जाऊन त्यांनी सीमा भागातील मराठी बांधवांचा आवाज ऐकायला हवा होता. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. पण केवळ खुर्ची वाचवण्यासाठी ते त्यांच्या बॉसच्या आदेशावरून भाजपच्या प्रचारासाठी गेले,’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
महाविकास आघाडीमधील मतभेदामुळे पुढे होणाऱया वज्रमूठ सभा रद्द झाल्याचा आरोप भाजपने केल्याबद्दल माध्यमांनी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘विरोधकांनी वज्रमूठ सभेचा धसका घेतला आहे. त्यामुळे सभा होऊच नयेत अशी त्यांची इच्छा आहे. पण आम्ही उन्हामुळे वज्रमूठ सभा घेत नाही आहोत. खारघरसारखी दुर्घटना घडू नये हा त्यामागचा उद्देश आहे. उन्हाळय़ानंतर पुन्हा सभा सुरू होतील.’
50 खोकेवाले घटनाबाह्य मुख्यमंत्री 40 टक्केवाल्यांचा प्रचार करायला कर्नाटकात गेले. खरं तर तिथे जाऊन त्यांनी सीमा भागातील मराठी बांधवांचा आवाज ऐकायला हवा होता. एकीकरण समिती उमेदवारांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते.

































































