महिनाभर आधीच उजनी मायनसमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीने गतवर्षीपेक्षा एक महिना अगोदरच तळ गाठला आहे. धरणाचा पाणीसाठा आज मायनसमध्ये गेला आहे. त्यामुळे सोलापूरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

उजनी धरण गेल्या वर्षी 13 जून रोजी मायनसमध्ये आले होते. यंदाच्या वर्षी 6 मे रोजीच म्हणजे तब्बल महिनाअगोदर मायनसमध्ये आले. सध्या धरणात पाणीपातळी 491.015 मीटर असून, एकूण साठा 1799.85 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 63.55 टीएमसी मृत साठा उपलब्ध आहे. टक्केवारी उणे 00.012 टक्के झाली आहे. धरण जलाशयातील पाणीपातळी 491.030 मीटर जाते, तेव्हा 00.00 टक्के जिवंत पाणीसाठा असतो. त्याखालील पाणीसाठा उणेमध्ये गणला जातो. 15 ऑक्टोबर 2022 रोजी उजनी धरणात 111.23 टक्के पाणीसाठा होता. गेल्या आठ महिन्यांत 60 टीएमसी पाण्याचा वापर केला आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वीच उजनी धरणातील पाणीपातळी मायनसमध्ये गेली आहे.

ढिसाळ नियोजन

गेल्या आठ महिन्यांत पाणी सोडण्याचे नियोजन ढासळल्याने 60 टीएमसी पाण्याचा वापर झाला. त्यामुळे उजनी मायनसमध्ये आली. यंदाच्या वर्षी 1 मार्चपासून सलग तीन आवर्तने सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे पाण्याची पातळी झपाटय़ाने घटली आहे.

सोलापूरकरांना दूषित पाणीपुरवठय़ाची शक्यता

उजनी धरणातील पाणीपातळी मायनसमध्ये गेल्याने शहर पाणीपुरवठय़ासाठी दुबार उपसा होणार आहे. त्यामुळे गाळाचे प्रमाण वाढेल. 10 मेपासून शहराकरिता नदीपात्रातून पाणी सोडण्यात येणार आहे. यास साखर कारखान्यांनी सोडलेली मळीमिश्रित पाणी औज बंधाऱयात पोहोचणार आहे. त्यामुळे गाळमिश्रित व पिवळसर अशा दूषित पाण्याचा साठा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सोलापूरकरांची दूषित पाणीपुरवठय़ाची चिंता वाढली आहे.