
>> गीतेश शिंदे
इं दिरा संत, शांता शेळके यांच्यानंतर सशक्तपणे मराठी कवितेत आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवणारं नाव म्हणजे अनुराधा पाटील. साधारणत: चार दशकांहून अधिक काळ काव्यलेखन करणाऱया अनुराधा ताईंचे आजवर ‘दिगंत’ (1981), ‘तरीही’ (1985), ‘दिवसेंदिवस’ (1992), ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ आणि ‘कदाचित अजूनही’ (2017) हे पाच कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. यातील ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहास 2019 च्या ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या संग्रहात एकूण 51 कविता असून या कवितांमधून स्त्राrच्या जगण्याचे ताणेबाणे, तिची भावावस्था, मानसिक आंदोलने टिपली आहेत. समाजाचा तिच्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याच्या गोष्टीवरही भाष्य केलेले आहे. एकीकडे स्त्राrवादी कवितेतून स्त्राr जाणिवांविषयी कंठशोष होत असताना अनुराधा पाटील यांची कविता मात्र कमालीची संयमी भासते. त्यात कुठेही टोकाचा स्त्राrवाद डोकावत नाही किंवा ती आवाजीही होत नाही. ‘म्हणून’ या पहिल्याच कवितेत अनुराधा पाटील असं लिहितात,
मी कविता लिहिते तेव्हा कृतीच करत असते
माणूसपणाच्या अधिकाधिक जवळ जाणारी
शब्दांप्रती, कवितेविषयी कवयित्रीच्या मनात कमालीची आत्मीयता असून त्यांच्या लिहिण्यात याबद्दल कृतज्ञतेचे भाव ओथंबून येतात. ‘भुकेला लाज नसते’ या कवितेतील पहिल्याच कडव्यातून बाईचं जग आजही फक्त चुलीपुरतंच सीमित असल्याचं कवयित्री म्हणते. अन्नाचे दोन-चार घास मिळावेत यासाठी राबणाऱया, कष्टणाऱया तिच्या चामडीला कुठलीच जात नाही. ती केवळ एक स्त्राr आहे आणि संसाराचा उभा डोंगर तिला हयातभर पेलायचा आहे. तिला स्वप्नं पाहण्याचं स्वातंत्र्य नाही, किंबहुना चुलीतल्या जाळाइतक्या मर्यादित उजेडाइतपतच तिचं जग पुरुषी समाजव्यवस्थेनं आखून दिलंय. खरं तर तिलाही भयमुक्त जगण्याची स्वप्नं पडतात, पण त्यांना कडी-कोयंडय़ात बंदिस्त केलं जातं. मग ती स्वप्नं जीव धरण्याआधीच दिगंतास जातात.
भुकेला लाज नसते अन् बाईच्या चामडय़ाला
जात म्हणत तू वावरलीस मुकाट
गायीच्या करुण डोळ्यांनी
हयातभर
जिथं चुलीतल्या जाळाच्या
उजेडात दिसेल
तेवढंच तुझं जग होतं
‘ती घरी परतली’, ‘या जन्मातलं’, ‘भुकेला लाज नसते’ या कवितांतून स्त्राrचं एकसुरी जगणं कवयित्रीनं मांडलं आहे. जगण्यासाठी करावयाच्या असंख्य तडजोडीत बाईला आपलं स्वत्व टिकवून ठेवण्यासाठी कमालीची कसरत करावी लागते. कालानुरूप त्यात तिचा चेहरामोहरा बदलतो. मनात साचलेलं चेहऱयावर आणि जगण्यातही न येऊ देण्याची कसरत करताना तिच्या आत अनेक उलथापालथी घडत असतात. नाटक संपल्यावर एखाद्या कसलेल्या अभिनेत्रीनं मेकअप उतरवून ठेवावा आणि नव्या भूमिकेत शिरावं तसं तिलाही अशा अनेक भूमिकांमधून जावं लागतं. ‘प्रयोग संपल्यावर’ या कवितेतून अनेकांगी भूमिका जगताना स्त्राrच्या मनाची होणारी कुचंबणा कवयित्रीनं पुढील शब्दांत रेखाटली आहे,
प्रयोग संपल्यावर उतरवला तिने
एकेक करत नाटकातल्या बाईचा मेकअप
पुसले चेहऱयावरचे चित्रविचित्र रंग
सोडवले सावकाश
खोटय़ा पापण्यांआड कैद केलेले उदास डोळे
बदलत्या सामाजिक वास्तवात स्त्राrचं स्थान, तिला येणारे अनुभव आणि या सर्वांचे तिच्या जीवनावर होणारे दृश्य-अदृश्य परिणाम ‘रस्ता ओलांडतांना’, ‘सध्या तरी‘, ‘कोण्या एके काळी’, ‘या जन्मातलं’, ‘आणि पुसून जाईल’ या कवितांमधून ठळकपणे समोर येतात. येणारा नवा दिवस तिच्यावर हातोडय़ासारखा आदळतो. हुंडय़ापायी कधी तिचा जीव घेतला जाईल याची काहीच शाश्वती नाही. तर कधी प्रेमास नकार दिला म्हणून अॅसिड फेकून वा भोसकून तिचं आयुष्य बरबाद करण्यात येईल अशा भीतीनं तिला ग्रासलंय. याविषयी ‘कोण्या एके काळी’ या कवितेत अनुराधा ताई लिहितात,
जिथं मी सारखी नखं कुरतडत राहते आजही
कुण्या अनोळखी पोरीवर झालेल्या अत्याचाराची
बातमी ऐकता ऐकता आणि कळतच नाही
आपण आपल्या स्वप्नात आहोत की दुसऱ्याच्या…
या कवितांमधली ‘ती’ समस्त स्त्री वर्गाचं प्रतिनिधित्व करते. या कवितांमधून सहवेदनेची, स्नेहाची, समजुतीची किनार दिसून येते. ‘आपण उभे असतो’, ‘वारी’, ‘माणूस नावाचा शब्द’ या कविताही उल्लेखनीय असून समाजातील असमतोलावर भाष्य करणाऱ्या आहेत. कदाचित अजूनही सर्व गोष्टी पूर्ववत होतील आणि जगण्याचा स्तर उंचावेल, माणसाचं पशूवत होणं थांबेल असा आशावाद अनुराधा पाटील यांच्या या कवितासंग्रहात सापडतो.
कदाचित अजूनही
कवी : अनुराधा पाटील
प्रकाशक : शब्द पब्लिकेशन
पृष्ठे : 128, मूल्य : 200 रुपये































































