
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने (सीईटी सेल) अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेला 44 हजार 954 विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. गैरहजर विद्यार्थ्यांमध्ये पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक विद्यार्थी आहेत.
एमएचटी सीईटी परीक्षेसाठी यंदा 6 लाख 36 हजार 89 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पीसीएम ग्रुपसाठी 3 लाख 33 हजार 41 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 13 हजार 732 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 19 हजार 309 विद्यार्थी गैरहजर होते. यामध्ये सर्वाधिक पुणे (1661) नागपूर (1417) लखनौ (1263) दिल्ली एनसीआर (1507) शहरातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
पीसीबी ग्रुपसाठी 3 लाख 3 हजार 48 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 77 हजार 403 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 25 हजार 645 विद्यार्थी गैरहजर होते. यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर (2957) पुणे (2769) नागपूर (1902) लातूर (1694) नगर (1594) नाशिक (1245) शहरातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पीसीएम ग्रुपपेक्षा पीसीबी ग्रुपच्या परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. पीसीएम ग्रुपचे 19 हजार 309 आणि पीसीबी ग्रुपचे 25 हजार 645 अशा एकूण 44 हजार 954 विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे सीईटी सेलकडून दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.


























































