सेम टू सेम! एकच नाव आणि एकच क्रमांक; यूपीएसीच्या दोन स्पर्धकांमुळे गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएसीच्या स्पर्धा परीक्षांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या स्पर्धेत महिलाराज दिसून आलं. पण, याच स्पर्धेत 184वा क्रमांक पटकावणाऱ्या एकाच नावाच्या दोन उमेदवारांमुळे गोंधळ उडाला आहे.

या दोन्ही महिला उमेदवारांचं नाव आयेशा असं आहे. त्या एकमेकींपासून अवघ्या 200 किमी अंतरात राहतात. एकीचं नाव आयेशा फातिमा असं असून ती मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यात राहते. तर दुसरीचं नाव आयेशा मकरानी असं असून ती अलीराजपूर येथे राहते. या दोघींच्या घरी आनंदाचं वातावरण आहे कारण, त्या दोघींचं नाव 184व्या क्रमांकावर असल्याचं दिसून येत आहे. मात्र, हा एकच क्रमांक नेमका कुणी पटकावला आहे, त्याबद्दल अद्याप संभ्रम आहे.

या दोघींनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी परीक्षा दिली, मुलाखतही पार पाडली आहे. या दोघींच्या प्रवेश पत्रिकेवर 7811744 हा एकच क्रमांक नमूद आहे. त्यांच्या परीक्षांच्या तारखाही 25 एप्रिल अशाच दिल्या आहेत. पण, मकरानी हिच्या प्रवेश पत्रिकेवर तो वार गुरुवार असा नमूद आहे तर फातिमा हिच्या प्रवेश प्रक्रियेत तो वार मंगळवार असा नमूद आहे. खरंतर त्या दिवशी मंगळवारच होता, तरीही अशी चूक कशी काय झाली, याबाबतही गोंधळ उडाला आहे.