सेलेब्रिटी चॉइस – वाचावे साक्षेपाने…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>राजेश देशपांडे

अगदी खरं सांगायचं तर माझं वाचन अफाट बिफाट नाही. मी एखादं पुस्तक वाचायला घेतलं की मध्येच कुठेतरी माझ्या कल्पना विश्वात रमतो आणि ते पुस्तक अर्धवट राहून जातं. अशी बरीच अर्धीमुर्धी वाचलेली पुस्तकं माझ्या घरात “अरे मला पूर्ण कर” म्हणत झुरत पडलेली आहेत. मी बारावीपर्यंत राजापूर तालुक्यातील येळवन नावाच्या अत्यंत दुर्गम आणि निसर्गरम्य गावात गेलं. गावात वर्तमानपत्रं आठवडय़ातून एकदा एक गठ्ठा यायचा. त्या वयात फक्त मागचं क्रीडा पानच वाचलं जायचं. माझे आईवडील शिक्षक. गावात त्यांनी शाळा काढली. त्यामुळे वाचनालयाची पुस्तकं येत. वाचनाची सुरुवात किशोर मासिक, दिवाळी अंक, षटकार याच्यापासून झाली. वडिलांना बाबुराव अर्नाळकर वगैरे वाचायला आवडत. मी पण गुपचूप ते वाचू लागलो. मग नकळत्या वयात जयवंत दळवी हाती लागले. काही कळत नसे. पण दळवी भुताटकीसारखे मानगुटीवर बसले. पु. ल. देशपांडे तर माझ्या आजीकडून नातेवाईक होते. आजी काहीतरी नातं सांगायची. पु.ल. आजही नैराश्याच्या काळात मनाला उभारी देतात. माझी आजी म्हणजे वडिलांची आई रामायण, महाभारतातल्या गोष्टी सांगत असे. माझे वडील दादा कोंडकेंच्या सोबत कलापथकात होते. त्यांच्यामुळे नाटकं वाचायला लागलो. मग याच क्षेत्रात यायचं म्हणून मुंबईत आलो आणि अलिबाबाची गुहाच सापडली.

कॉलेजमध्ये जी. ए. कुलकर्णी झपाटल्यासारखे वाचले. पाडगावकर, आरती प्रभू, नारायण सुर्वे, ग्रेस आणि इतर अनेक कवींच्या कवितांशी मैत्री झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचेही असेच वेड लागले. आयुष्यात कुठलंही मोठं आव्हान आलं की मी महाराजांचा इतिहास आठवतो आणि ते आव्हान स्वीकारायचं बळ येतं. हळूहळू इंग्रजी वाचायचं पण धाडस करू लागलो. नंतर मालिका, चित्रपट क्षेत्रात आल्यावर तद्नुषंगिक वाचन व्हायला लागलं. अभ्यास म्हणून आत्मचरित्र वाचतो. एकदा महात्मा गांधींचं सत्याचे प्रयोग हाती लागलं आणि ते वाचल्यावर महात्मा पद मिळाल्यावर आपल्या आयुष्यातले प्रमाद जाहीरपणे लिहिणाऱया मोहनदास करमचंद गांधींना सलाम केला. अनेक गैरसमज दूर करणारी पुस्तकं वाचनात आली. त्यातलंच एक एस. एल. भैरप्पा यांचं पर्व. महाभारत आणि तत्कालीन जीवन याविषयी अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध लेखन आहे तसेच वि. का. राजवाडे यांचं भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचल्यावर भोंदू नैतिकतेची पुटं ओरबाडली जातात. भाऊ पाध्ये, तेंडुलकर वगैरेंनी तर खाडकन कानाखाली मारलंच होतं. अलीकडेच सुभाष अवचट यांचं कुतूहलापोटी हा एक अमूल्य ऐवज गवसला आणि पेशी ते वनस्पतीपर्यंतचा अभ्यासपूर्ण खजिना गावला. प्रत्येकाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे. सध्या आर्य चाणक्य अभ्यासतोय. किरण येले, डॉक्टर स्मिता दातार यांची पुस्तकं, सेपियन्स टेबलवरून हाका मारत आहेत. रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ‘दिसा माजी काही ते लिहावे, काहीतरी वाचावे साक्षेपाने” हे वचन आचरून दिवसांची पाने पलटत असतो मी. पण जे वाचतो ते आचरणात आणलं नाही तर काय हशील?