एटीएम मशीनमधून पैसे काढणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका सरकारी बँकेच्या एटीएम कॅश डिस्पेन्सरला चिप लावून पैसे काढू पाहणाऱया दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली. चंदन रजक आणि विकास कुमार पासवान अशी त्यांची नावे आहेत. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मालाड येथे एक सरकारी बँकेचे एटीएम सेंटर आहे. मे पहिल्या आठवडय़ात एक जण त्या एटीएममध्ये गेला. तो एटीएम कॅश डिस्पेन्सरशी छेडछाड करत असल्याचे बँकेच्या लक्षात आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने बँकेने एटीएममधील सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी केली.

एक जण कॅश डिस्पेन्सरच्या मदतीने पैसे काढू पाहत होता, मात्र पैसे न निघाल्याने तो निघून गेला. घडल्याप्रकरणी बँकेने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. बँकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावरून पोलिसांनी चंदन आणि विकास कुमारला ताब्यात घेऊन अटक केली. त्या दोघांनी आतापर्यंत किती एटीएम सेंटरमध्ये छेडछाड करून पैसे काढले, ते कोणत्या टोळीशी निगडित आहेत का, याचा तपास मालाड पोलीस करत आहेत.