
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या अपघाताच्या 51 तासांनंतर पुन्हा एकदा रेल्वे रुळावरून धावली आहे. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हात जोडून ट्रेनला निरोप दिला. या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल, तसेच जो कोणी दोषी असेल त्याला कठोर शिक्षा दिली जाईल. असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. रात्री 11 वाजता ते घटनास्थळी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम करून दोन्ही ट्रॅक पूर्ववत केले आहेत. अपघातानंतर 51 तासांतच रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे. दोन्ही ट्रॅकची चाचणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आता दोन्ही मार्गावरून गाड्या धावू लागल्या आहेत.
ओडिशाच्या बालासोरमध्ये, जिथे रेल्वे अपघात झाला, तिथे चोवीस तास युद्धपातळीवर काम सुरू आहे. रेल्वेचे शेकडो कर्मचारी, मदत बचाव पथकाचे कर्मचारी, तंत्रज्ञांपासून अभियंत्यांपर्यंत सगळेजण याठिकाणी रात्रंदिवस काम करत आहेत. अपघातानंतर घटनास्थळी रुळावर विखुरलेल्या बोगी आता बाजूला काढून बाजूला नेण्यात आल्या आहेत. अपघातानंतर एक्स्प्रेस ट्रेन आणि मालगाडीचे उर्वरित डबेही रुळावरून बाजूला काढण्यात आले आहेत. बोगींमध्ये अडकलेल्या लोकांना आधीच बाहेर काढण्यात आले असून आता ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे.




























































