बचत करा, आनंदाने रहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रहास रहाटे

बचत केल्याशिवाय होत नाही आणि त्याहूनही खर्च करण्याच्या अगोदर बचत केली नाही तर बचत होणे अवघडच आहे. कारण खर्चावर आपले काहीच नियंत्रण नसते. त्यामुळे बचतीकडे अत्यावश्यक गोष्ट म्हणूनच पाहणे गरजेचे आहे. हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या प्रवासाचे तीन टप्पे असतात ते म्हणजे जवळचा पल्ला, मध्यम पल्ला आणि दूरचा पल्ला. या प्रवासात या तिन्ही पल्ल्यांमध्ये अनेक गरजा येतात. अगदी वैद्यकीय गरजेपासून अचानक उद्भवणाऱया गरजांचा समावेश जवळच्या पल्ल्यामध्ये येतो. मध्यम पल्ल्यामध्ये घर विकत घेणे, इंटिरिअर करणे, फॉरेन टूर, गाडी विकत घेणे अशा अनेक गरजांचा समावेश होतो तर मुलांचे उच्च शिक्षण, त्यांची लग्ने व आपल्या निवृत्तीची तरतूद अशा अनेक गरजा लांब पल्ल्यामध्ये मोडू शकतात.

यामुळे आपल्या उत्पन्नापैकी 20 टक्के रक्कम जवळच्या पल्ल्यासाठी व 20 टक्के रक्कम मध्यम व लांब पल्ल्याच्या गरजांसाठी बाजूला काढणे अत्यंत गरजेचे आहे.

आपल्या या प्रवासात सर्वच गोष्टी स्वतःचे पैसे देऊन आपण विकत घेऊ शकत नाही. घर घेताना व गाडी घेताना कर्ज घेण्याची गरज लागते, पण या कर्जाचा आपल्या उत्पनाच्या 30 टक्के पेक्षा जास्त हप्ता असू नये. उरलेली 30 टक्के रक्कम कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी वापरायला हवी. अशा प्रकारे उत्पन्न, बचत, कर्जाचा हप्ता व कुटुंबाचे खर्च यामध्ये विभागले जाऊ शकते.

जर आपल्याला कर्ज घ्यायची गरज भासली नाही तर काही भाग बचतीकडे वळवून उर्वरित भाग राहणीमान उंचावण्यासाठी केला जाऊ शकतो.

कधी कधी कर्जाचा हप्ता उत्पन्नाच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त होतो आणि येथेच सुरू होते रॅट रेस. घरचा खर्च तर करायलाच हवा. त्यामुळे बचतीशी तडजोड होते. पर्यायाने भविष्यात येणाऱया गरजा अधांतरी राहतात व ज्या गरजा बचतीच्या माध्यमातून पूर्ण करता आल्या असत्या त्या गरजांसाठीदेखील कर्ज काढायची पाळी येते व अवघं आयुष्य कर्जमय होते. या उंदराच्या शर्यतीत आयुष्य ईएमआय बनून जातं व आपली मानसिक शांतता पूर्णतः निघून जाते.

येथेच मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे राहणीमानावर निर्बंध घालण्याचा. त्याला लाईफस्टाईल कॅपिंग असंही म्हणतात. आपण जेवढं कमवतो त्याचे भान ठेवणे व त्याप्रमाणे आपले राहणीमान जगणे, अधिक चांगलं राहणीमान उपभोगण्यासाठी अधिक पैसे कमविणे व त्याप्रमाणे आपले राहणीमान उपभोगणे, कितीही कमवले तरीही आपल्या कर्जाची मर्यादा उत्पन्नाच्या 30 टक्क्यांच्या आत ठेवणे आणि तर आणि तरच बचतीची तडजोड होणार नाही व भविष्यातल्या गरजांसाठी कर्जाची गरज लागणार नाही.

हा लेख नुसता वाचून काही उपयोग होणार नाही. म्हणून बसा आणि कागदावर हिशोब मांडा. बचतीचा मंत्र समूजन घ्या. यातच आपले भले आहे. आपल्या उत्पन्नाच्या किती टक्के आपण बचत करतोय ? किती टक्के माझा कर्जाचा हप्ता आहे आणि किती टक्के खर्च कुटुंबासाठी होतोय? यामध्ये जर विसंगती आढळली तर येणाऱया काळात जाणीवपूर्वक ती सुधारा. यामुळे या जीवनाच्या प्रवासात आपण शांततेने व आनंदाने आपला वेळ व्यतीत कराल. सुखी जीवनाची हीच तर गुरुकिल्ली आहे.
(लेखक आर्थिक सल्लागार आहेत)