नागरी निवारा संकुलातील गृहनिर्माण संस्थांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण, आमदार सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत तज्ञांकडून मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिंडोशी येथील नागरी निवारा संकुलात सरकारी जमिनीवर 113 गृहनिर्माण संस्था असून त्यांना दैनंदिन कामकाज करताना अनेक समस्या भेडसावतात. त्या कशा सोडवाव्यात, संस्थेचे कामकाज कसे करावे, जमिनीच्या हस्तारणाची प्रक्रिया काय आहे याबाबतच्या शंकांचे निराकरण आज झाले. त्यांना तज्ञांकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाल्याने संस्था आता आपले दैनंदिन कामकाज योग्यरितीने करणे शक्य होणार आहे.

नागरी निवारा संकुलातील गृहनिर्माण संस्थांना दैनंदिन कामकाजात येणारे अडथळे, जमिनीच्या हस्तांरणाविषयी माहिती, निवडणूक प्रक्रिया, स्वयंपुनर्विकास विकास याबाबतच्या प्रशानांचे योग्य उत्तर मिळावे म्हणून  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई जिल्हा उपनगर को-ऑप. हाऊसिंग फेडरेशन लिमिटेडचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्या प्रयत्नाने आणि नागरी निवारा फेडरेशन सहकार्याने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी सह गृहनिर्माण संस्थांचे दैनंदिन प्रश्न आणि कायदेशीर माहितीबाबत रमेश प्रभू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शासकीय जमिनीवर सरकारच्या अटी-शर्ती आणि वेगवेगळय़ा शासन निर्णयाबाबत सलील रमेशचंद्रन यांनी मार्गदर्शन केले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास किंवा स्वयंपुनर्विकासाबाबत मुंबई जिल्हा बँक कशा पद्धतीने सहकार्य करते याबाबत मुंबई जिल्हा उपनगर सहकारी हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष अभिषेक घोसाळकर यांनी मार्गदर्शन केले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीबाबत फेडरेशनच्या सदस्या सुनीता गोडबोले यांनी सविस्तर माहिती दिली. नागरी निवारा संकुलातील गृहनिर्माण संस्थांच्या समस्यांबाबत आपण सरकार दरबारी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार सुनील प्रभू यांनी दिली. नागरी निवारा फेडरेशनचे सचिव मुकुंद सावंत, उपाध्यक्ष शैलेश पेडामकर यांच्यासह सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.